जिम्नॅस्टिक्स संघटनेची केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद : जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात तीस छत्रपती पुरस्कार विजेते असणाऱ्या औरंगाबादमधून आता या खेळाचा सराव करणाऱ्या दीड हजार विद्यार्थ्यांना भारतीय खेल प्राधिकरणाचे (साइ) अधिकारी ‘तुम्ही सरावासाठी इतरत्र सोय बघा’ असे सांगू लागले आहेत. औरंगाबादमधील हे सराव केंद्र बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे त्यावरून दिसून येत आहे. सध्या शहरात १५००हून अधिक खेळाडू या क्रीडा प्रकाराचा सराव करत आहेत. तरी भारतीय खेल प्राधिकरणाच्या औरंगाबादमधील जिम्नॅस्टिक्सचा सराव केंद्र बंद करण्याच्या हालचालींना रोखावे, अशी विनंती महाराष्ट्र अ‍ॅमेचर जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव मकरंद जोशी यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांच्याकडे केली आहे.

जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात महाराष्ट्र हे अव्वल ठरणारे राज्य असून पदके मिळविणाऱ्यांमध्ये औरंगाबादच्या केंद्राचा क्रमांक वरचा आहे. राज्यभरातून औरंगाबादच्या भारतीय खेल प्राधिकरण विभागात निवडण्यात आलेल्या खेळाडूंना आता सरावासाठी तुम्ही अन्यत्र केंद्राची निवड करा, असे तोंडी सांगितले जात आहे. खरे तर औरंगाबाद शहरात हा खेळ वाढावा आणि रुजावा यासाठी या असोसिएशनचे सचिव मकरंद जोशी यांनी विशेष प्रयत्न केले होते.

आता शैक्षणिक वर्षांच्या मध्यातूनच सराव केंद्र बदलण्याबाबतच्या सूचना दिल्या जात असल्याने त्याचा अभ्यासावरही परिणाम होईल आणि शहरात निर्माण झालेले या खेळाविषयीचे आकर्षण अकारण कमी केले जात असल्याचा संदेश खेळाडूंमध्ये जाईल. त्यामुळे हे सराव केंद्र बंद करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर साई केंद्राच्या पालकांच्यावतीनेही क्रीडामंत्र्यांना स्वतंत्र पत्र पाठविण्यात आले असून हॉकीसाठी सिंथेटिक मैदान बनवताना पाण्याबाबतचे नियोजन केले जात नसल्याची तक्रारही पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या असोसिएशनचे सचिव श्रीकांत हेकाडे आणि अध्यक्ष प्रवीण हत्तेकर यांनी जिम्नॅस्टिक्स सराव केंद्र बंद करण्याची भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल, असे पत्राद्वारे नमूद केले आहे.