संपूर्ण वर्षभर सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या लुइस हॅमिल्टनने वर्षांतील शेवटच्या अबू धाबी ग्रां.प्रि. शर्यतीत अव्वल स्थानासह विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. या विजयासह मर्सिडीझचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॅमिल्टनने कारकीर्दीत दुसऱ्यांदा ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम केला.
विश्वविजेतेपदासाठी हॅमिल्टनची संघसहकारी निको रोसबर्गशी टक्कर होती. रोसबर्गने पोल पोझिशन पटकावत आश्वासक सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या स्थानावरून शर्यतीला सुरुवात करणाऱ्या हॅमिल्टनने अल्पावधीतच आघाडी मिळवली. शर्यतीदरम्यान रोसबर्गच्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे रोसबर्गचा वेग मंदावला. याचा पुरेपूर फायदा उठवत हॅमिल्टनने बाजी मारली. अंतिम रेषा पार केल्यानंतर हॅमिल्टनने गाडीवर उभे राहून आनंद साजरा केला. त्यानंतर त्याने पिटस्टॉपमध्ये जाऊन आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतली. यंदाच्या हंगामातील हॅमिल्टनचे हे ११वे जेतेपद ठरले.
तब्बल ६७ गुणांच्या फरकाने रोसबर्गला मागे टाकत हॅमिल्टनने विश्वविजेतेपदाची कमाई केली. ११ जेतेपदांसह हॅमिल्टनने मायकेल शूमाकर आणि सेबॅस्टियन वेटेल यांच्या हंगामातील सर्वाधिक जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamilton wins abu dhabi gp second f1 title