भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. धोनीने आज ३९ वर्षे पूर्ण करून वयाच्या ४०व्या वर्षात (Fabulous 40) पदार्पण केले. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत धोनीने भारताकडून उपांत्य सामना खेळला. त्या पराभवानंतर धोनीला पुन्हा अद्याप संघातून खेळायची संधी मिळालेली नाही. धोनी लवकरच निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा गेले १० महिने रंगताना दिसत आहे, पण धोनी अजूनही क्रिकेट खेळण्यास सक्षम आहे असे त्याची पत्नी साक्षी आणि चाहते दोघेही सांगताना दिसतात. धोनी गेले अनेक क्रिकेटपासून दूर असला, तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत अजिबात घट झालेली नाही. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आजी-माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेटविश्वाने आणि चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळणार का नाही, अशी चर्चा सध्या रंगली आहे. तसेच, IPL 2020 मध्येही धोनीचा फॉर्म कसा असेल, याचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. चेन्नईने लॉकडाउनआधी घेतलेल्या सराव सत्रात धोनीने तंदुरूस्ती सिद्ध केली होती. पण सध्या धोनी काय करतो? आणि नंतर त्याचा क्रिकेटबद्दल काय विचार आहे हे धोनीकडूनच निश्चित समजू शकेल.