टी-२० वर्ल्डकप स्पर्धा काही दिवसांवरच आली असून भारतीय संघही या स्पर्धेसाठी सज्ज होताना दिसत आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. पाठीच्या शस्त्रक्रियेनतंर हार्दिकच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही. यंदाच्या आयपीएल हंगामातही तो विशेष काही करू शकला नाही. दुखापतीमुळे त्याच्या गोलंदाजी करण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे हार्दिकला या वर्ल्डकपमध्ये खेळवता येणार नाही, अशा चर्चा समोर आल्या होत्या.

मुंबई इंडियन्सचा कोच महेलला जयवर्धनेनेही हार्दिकबाबत प्रतिक्रिया दिली होती. ”हार्दिक आयपीएल २०२१ मध्येही गोलंदाजी करणार नाही. जर त्याला गोलंदाजी करण्यास भाग पाडले गेले, तर त्याच्या फलंदाजीवरही परिणाम होऊ शकतो.” जयवर्धनेच्या या वक्तव्यानंतर टीम इंडियाचे निवडकर्ते चिंतेत पडले, कारण हार्दिकची गोलंदाजी नसल्यामुळे संघाचे संतुलन बिघडते आणि याचा अर्थ असाही होऊ शकतो की हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

हेही वाचा – ‘‘मला विश्वास आहे, की टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान भारताला नक्की हरवेल”

मात्र आता निवड समितीने हार्दिकच्या या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आहे. इनसाइड स्पोर्ट्सच्या बातमीनुसार, निवड समितीने म्हटले आहे की आता टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणताही बदल होणार नाही. शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेसाठी तयार नाहीत.

पाकिस्तानविरुद्ध कोण खेळणार?

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारत रोहित, राहुल, कोहली, सूर्यकुमार, पंत, पंड्या, जडेजा, अश्विन, राहुल, शमी आणि बुमराह यांच्यासह मैदानात उतरू शकतो. राहुल चहरच्या जागी वरुण चक्रवर्तीलाही संधी दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत बुमराह, शमी, राहुल आणि अश्विन हे भारताचे मुख्य गोलंदाज असतील, तर जडेजा आणि पंड्या यांना उर्वरित चार षटके एकत्र गोलंदाजी करावी लागेल. सूर्यकुमारच्या खराब फॉर्ममुळे त्याला संघातूनही वगळले जाऊ शकते आणि त्याच्या जागी अक्षर पटेल किंवा शार्दुल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते. असे झाल्यास, भारताकडे सात गोलंदाजी पर्याय असतील आणि पंड्या गोलंदाजी करत नसला, तरी कोहलीकडे सहा गोलंदाजी पर्याय असतील.