India Women vs Australia Women Semi Final Score: वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत, सेमी फायनलच्या लढतीत भारतीय संघासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाच्या नावावर वर्ल्डकपची सात जेतेपदं आहेत. यंदाच्या स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच्या वर्चस्वाने खेळतो आहे. मात्र सेमी फायनलच्या लढतीत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही कांगारूंसाठी डोकेदुखी आहे.
वनडेत हरमनप्रीतच्या नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ सामन्यात ३५.६६च्या सरासरीने ७४९ धावा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दर्जेदार आक्रमणाविरुद्ध खेळताना हरमनप्रीतची बॅट तळपते. २०१७ वर्ल्डकप स्पर्धेत हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच १७१ धावांची अफलातून खेळी साकारली होती. वनडे क्रिकेटमधल्या सार्वकालीन महान खेळींमध्ये त्या खेळीचा समावेश होता. स्लॉग स्वीप आणि डाऊद द ट्रॅक येत गोलंदाजांच्या डोक्यावरून साईटस्क्रीनपल्याड चेंडू भिरकावून देण्यात हरमनप्रीतचा हातखंडा आहे.
आयपीएलच्या धर्तीवर ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग सुरू झाली. बिग बॅश ही पुरुषांप्रमाणेच महिलांचीही खेळवण्यात येते. बिग बॅश लीग स्पर्धेत खेळणारी हरमनप्रीत ही पहिली भारतीय खेळाडू आहे . ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातत्याने चांगलं खेळत असल्याने तिथल्या संघांनी हरमनप्रीतला ताफ्यात समाविष्ट करण्यात उत्सुकता दाखवली. सिडनी थंडर संघाने हरमप्रीतला ताफ्यात दाखल करून घेतलं. जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हरमनप्रीतने ३१ चेंडूत ४६ धावांची खणखणीत खेळी साकारत संघाला थरारक विजय मिळवून दिला होता.
२०१३ मध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध केलेल्या शतकासह हरमनप्रीतने क्रिकेटजगताचं लक्ष वेधून घेतलं. त्याचवर्षी मिताली राजला विश्रांती देण्यात आलेली असताना हरमनप्रीतकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. तीन वर्षांनी कर्णधारपदाची धुरा तिच्याकडे देण्यात आली. तेव्हापासून तिने संघाची उत्तम मोट बांधली आहे. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांच्याकडून चांगला खेळ करवून घेणं, स्वत:मोठी खेळी साकारत संघासमोर वस्तुपाठ सादर करणं, अफलातून क्षेत्ररक्षण, गोलंदाजांशी चर्चा आणि अपेक्षित यश न मिळाल्यास त्यांचा हुरुप वाढवणं या सगळ्या गोष्टी हरमनप्रीत नेटाने करते आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधली कामगिरी सुधारली. भारताची परदेशातली कामगिरीतही अमूलाग्र सुधारणा झाली आहे. २०२० मध्ये टी२० वर्ल्डकपमध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वातच भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती.
हरमनप्रीतचा अनुभव आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिचा फॉर्म भारतीय संघासाठी जमेची बाजू आहे. तिने ६ टेस्ट, १५९ वनडे आणि १८२ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. ३६वर्षीय हरमनप्रीत कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. भारतीय संघाला पहिलंवहिलं जेतेपद मिळवून देण्यासाठी ती उत्सुक आहे.
