हस्तांदोलन प्रकरणाचा वाद पेटलेला असतानाच भारत-पाकिस्तान आशिया चषकात पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. आशिया चषकात रविवारी झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. या सामन्याआधी झालेल्या नाणेफेकीवेळी दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने हस्तांदोलनात स्वारस्य दाखवलं नाही. या वागण्यामुळे नाराज होऊन पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. पत्रकार परिषदेला पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी संबोधित केलं. त्यांनीही हस्तांदोलन प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हस्तांदोलन मुद्यावरून सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. मागणी मान्य न झाल्यास स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी त्यांनी दिली. दरम्यान आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी फेटाळली आहे.

प्राथमिक फेरीनंतर सुपर फोर हा स्पर्धेचा पुढचा टप्पा आहे. प्राथमिक फेरीत गटात अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरणार आहेत. भारतीय संघ अ गटातून अव्वल स्थानसह सुपर फोर टप्पा गाठण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला सुपर फोर टप्पा गाठण्यासाठी युएईला नमवणं आवश्यक आहे. तर ते A2 म्हणून सुपर फोरसाठी पात्र ठरतील. अशा परिस्थितीत २१ सप्टेंबर रोजी रविवारी भारत-पाकिस्तान सुपर फोर फेरीत आमनेसामने असतील.

दोन्ही संघांनी अपेक्षित विजयी वाटचाल केल्यास, २८ तारखेला होणाऱ्या अंतिम लढतीत हेच दोन्ही संघ पुन्हा एकदा समोरासमोर असतील.

एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांनी प्राण गमावले होते. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धस्त करत प्रत्युत्तर दिलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध दुरावले. आशिया चषकात हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळणार का? याविषयी साशंकता होती. केंद्र सरकारने यासंदर्भात भूमिका जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद तसंच आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित सामन्यांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळेल. मात्र द्विराष्टीय मालिका होणार नाही. सोप्या भाषेत भारतीय संघ पाकिस्तानात मालिकेसाठी जाणार नाही. याच धर्तीवर पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. केंद्र सरकारने हे धोरण स्पष्ट केल्यामुळे भारतीय संघ आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळणार हे स्पष्ट झालं.