ड्वेन ब्राव्होची हरवलेली बॅट सचिन तेंडुलकरनं कशी शोधली? वाचाल तर चकित व्हाल…

दिग्गज खेळाडू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा किती डिटेलमध्ये अभ्यास करतात हे सांगताना सचिनचा हा किस्सा सांगितला.

how sachin tendulkar and Dwayne bravo bat
सचिनच्या ग्रेटनेसचा हा किस्सा सध्या ठरतोय चर्चेचा विषय

सचिन तेंडुलकर सारखे दिग्गज खेळाडू थोर असतात कारण, ते त्यांच्या क्षेत्राशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा अत्यंत बारकाईनं विचार करतात. प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्ये अत्यंत खोलात जातात आणि प्रभुत्व मिळवतात. ते नक्की काय करतात हे नुकतंच उलगडून सांगितलं स्टँड अप कॉमेडियन विक्रम साठये यांनी. जागतिक किर्तीवर प्रसिद्ध असलेल्या साठये यांनी एबीपी माझाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत असे अनेक किस्से सांगितले जे सर्वसामान्य क्रीडा रसिकांना चकित करणारे आहेत. असाच एक किस्सा आहे ब्राव्होच्या हरवलेल्या बॅटचा.

साठयेंनी एकदा सचिनला विचारलं, की १४० च्या वेगानं येणारा चेंडू खरंच तुला दिसतो? त्यावर तेंडुलकर म्हणाला मला केवळ बॉल येताना दिसतच नाही, तर बॉलचा रंग कसा बदलत जातो, कुठल्या ओव्हरला तो कसा वागेल हे ही कळतं. याला कारण आहे तो अत्यंत मेहनतीनं प्रत्येक बारीक सारीक गोष्टवर प्रचंड लक्ष द्यायचा. अटेन्शन टू डिटेल हे लोक इतकं करतात, की प्रत्येक गोष्टीचा किस पाडतात, साठये म्हणाले.

“साधी बॅट हातात घेतली की बॅटच्या पृष्ठभागावर तो पंधरा पंधरा मिनिटं टिचक्या मारून आवाज कसा येतो ते चेक करतो. त्याला अपेक्षित असलेला साउंड आला तर समजायचं ही बॅट चांगली. ड्वेन ब्राव्होची बॅट मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये हरवली होती. ती सापडत नव्हती. ब्राव्होला कळत नव्हतं, सारख्या दिसणाऱ्या इतक्या बॅटींमधली, आपली बॅट कुठली आहे. सचिन तेंडुलकरनं सांगितलं, तुझी बॅट मी चेक केली होती, तुझ्या वाटतायत त्या चार पाच बॅटी मला बघू दे. सचिननं त्या बॅट टिचकी मारून वाजवल्या व काय आवाज येतो ते चेक केलं. नंतर त्यानं एक बॅट ब्राव्होला दिली नी सांगितलं ही तुझी बॅट, कारण मी ती चेक केली होती नी हा तोच आवाज आहे.”

दिग्गज खेळाडू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा किती डिटेलमध्ये अभ्यास करतात हे साठये यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How sachin tendulkar and dwayne bravo bat vikram sathaye narrates the incidence

Next Story
यशस्वी क्रिकेटपटूंसाठी तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची – वेंगसरकर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी