”पाकिस्तानच्या विरोधात खेळत असताना भारताचे पारडे कधीही जड असते. हा सामना आपण जिंकावा म्हणजे सगळ्यांना मिळून या सामन्याचा आनंद घेता येईल.” असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर म्हणाला. भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये लंडन येथील ओव्हल मैदानावर रंगणाऱ्या चॅंपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याविषयी देशभरात उत्सुकतेचे वातावरण आहे. त्याबाबत तो बोलत होता. हा सामना कसा होणार आणि कोणता संघ जिंकणार याची उत्सुकता सामान्यांप्रमाणे सचिनलाही आहे. या सामन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सचिन तेंडुलकरचे ठोकेही वाढले आहेत. या सामन्यात भारताचेच पारडे जड असेल असे सचिनचे म्हणणे आहे.

भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरुन मास्टरब्लास्टरने वर्तविलेला अंदाज खरा ठरणार का, हे काही तासांतच आपल्याला कळणार आहे. या अंतिम सामन्याच्या निकालाबाबत भारतीयांप्रमाणेच जगातील लोकांमध्ये आतुरता आहे. सचिनने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर संघातील इतर खेळाडूंचीही प्रशंसा केली. सचिन म्हणाला, चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान विराटचे नेर्तृत्त्व चांगले राहीलेले आहे. विराटबरोबरच रोहित शर्मा आणि शिखर धवननेही उत्तम फलंदाजी केल्याचे तो म्हणाला. युवराजनेही उत्तम खेळ केला असून गोलंदाजी करणाऱ्यांनी आणि फिरकीपटूंनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे. हे खेळाडू अंतिम सामन्यातही असाच उत्तम खेळ करत आपला संघ मजबूत असल्याचे दाखवून देतील.

मास्टरब्लास्टर म्हटला, भारत या स्पर्धेमध्ये अतिशय तयारीनिशी उतरला आहे. पूर्ण स्पर्धेदरम्यान भारताने अतिशय उत्तम खेळ खेळत आपले स्थान दाखवून दिले आहे. याचवेळी पाकिस्तानी संघाबाबतही सचिनने भाष्य केले आहे. तो म्हणाला, पाकिस्तानच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे, मात्र रविवारचा दिवस नवा असल्याने भारतीय संघाला त्यादृष्टीने तयारी करण्याची आवश्यकता आहे.