चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघाला ओव्हलच्या मैदानावर पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना आघाडीच्या फळीने भारतीयांना निराश केले. फलंदाजीच्या जोरावर अंतिम सामन्यापर्यंत धडक मारल्यानंतर अंतिम सामन्यात फलंदाजी कुचकामी ठरली. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर भारतीय संघ मोठ्या संकटात सापडला. यावेळी भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना पांड्याने भारतीयांच्या मनात विजयाची एक आशा पल्लवित केली. आघाडीची फलंदाजी कोलमडल्याचे कोणतेही दडपण न घेता तो आपला नैसर्गिक खेळी करताना दिसला. त्याच्या स्फोटक खेळीने भारतीयांच्या सामन्यातील पुनरागमनाच्या आशा पुन्हा एकदा वाढल्या. मात्र रवींद्र जाडेजा आणि त्याच्यामध्ये ताळमेळ बिघडला अन् भारताच्या जागृत झालेल्या आशा पुन्हा मालवल्या. हार्दिक पांड्याने धाव बाद होण्यापूर्वी ४३ चेंडूत ७६ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याने आयसीसीच्या स्पर्धेतील फायनलमध्ये सर्वाधिक जलद अर्धशतकी खेळी केली. मात्र तो ज्या पद्धतीने धाव बाद झाला त्यामुळे नेटिझन्सनी काही प्रमाणात जाडेजाला जबाबदार धरले आहे. धावबाद झाल्यानंतर पांड्या देखील आपली नाराजी लपवू शकला नव्हता.

जाडेजाच्या स्वार्थाचा हार्दिक पांड्या बळी ठरल्याचे एका नेटिझन्सने म्हटले आहे. तर एका नेटिझन्सने भारताच्या अखेरच्या आशा जाडेजामुळे संपुष्टात आल्याचे ट्विट केले आहे. हार्दिक पांड्याच्या बहदार खेळीमुळे पांड्याच्या नावाचा ट्रेण्ड ट्विटरवर दिसत असून तो धावबाद झाल्यामुळे रवींद्र जाडेजा सुद्धा ट्रेण्डिंगमध्ये आल्याचे दिसते. यामध्ये एका नेटिझन्सने बाहुबली चित्रपटातील कटप्पाने बाहुबलीला मारतानाचा एक व्हिडिओ शेअर करुन जाडेजावर नाराजी व्यक्त केली आहे. शेवटी खेळात अशा चुका होतच असतात. आपल्या सहकाऱ्याला ठरवून कोण बाद करत नाही. त्यामुळे जाडेजाने ही चूक मुद्दाम नक्कीच केलेली नाही. मात्र पांड्याप्रमाणेच नेटिझन्स सध्या त्याच्या या चुकीवर नाराज आहेत.