उपांत्य फेरीपूर्वी भारताला धक्का
नवी मुंबई : भारतीय संघाची भीती अखेर खरी ठरली असून सलामीची फलंदाज प्रतिका रावलला पायाच्या दुखापतीमुळे महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रविवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना प्रतिकाला गंभीर दुखापत झाली. शर्मिन अक्तरने ‘मिडविकेट’च्या दिशेने मारलेला चेंडू अडविण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ पावसामुळे निसरड्या झालेल्या भागात प्रतिका घसरली आणि तिचा उजवा पाय मुरगळला. घोटा दुखावल्याने ती कळवळली आणि फिजिओ, तसेच भारताच्या अन्य खेळाडूंनी त्वरित तिच्याजवळ धाव घेतली. त्यानंतर राखीव खेळाडूंच्या मदतीने ती मैदानावर गेली. प्रतिकाच्या गुडघ्याला आणि घोट्याला दुखापत झाल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) देण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी प्रतिका स्पर्धेबाहेर गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पावसामुळे भारत-बांगलादेश सामना रद्द झाल्यानंतर स्टेडियममध्येच असलेल्या रुग्णालयात प्रतिकाच्या चाचण्या करण्यात आल्या. तसेच ती अन्य डॉक्टरांचा सल्ला घेणेही अपेक्षित आहे.
प्रतिका बाद फेरीच्या सामन्यांना मुकणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. गतवर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून प्रतिकाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तसेच तिने सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातही चमक दाखवली आहे. तिने सहा डावांत ५१.३३ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या असून यात एका शतकाचाही समावेश आहे. सलामीला प्रतिका आणि स्मृती मनधाना यांची भूमिका भारतासाठी महत्त्वाची ठरत आहे. आता प्रतिकाच्या अनुपस्थितीत सलामीला कोण खेळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सलामीसाठी पर्याय कोण?
शफाली वर्मा : प्रतिकाच्या आधी स्मृती मनधानाच्या साथीने शफाली वर्मा सलामीला येत होती. मात्र, तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही आणि तिने एकदिवसीय संघातील स्थान गमावले. परंतु तिच्यातील पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत खेळण्याची क्षमता भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल. ती विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाचा किंवा राखीव फळीचा भाग नाही. मात्र, प्रतिकाच्या दुखापतीमुळे तिला बाहेरून बोलविण्याचा पर्याय भारताकडे आहे.
तेजल हसबनीस : राखीव फळीत स्थान मिळालेल्या खेळाडूंत तेजल हसबनीस ही एकमेव विशेषज्ञ फलंदाज आहे. महाराष्ट्राच्या तेजलने आतापर्यंत सहा एकदिवसीय सामन्यांत १४० धावा केल्या आहेत. मात्र, ती मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी ओखळली जाते. त्यामुळे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत तिला सलामीला खेळविण्याचा धोका भारतीय संघ पत्करणार का, हे पाहावे लागेल.
हरलीन देओल : प्रतिकाच्या अनुपस्थितीत हरलीन देओल सलामीला खेळू शकेल, असे मत भारताची माजी कर्णधार मिताली राजने व्यक्त केले आहे. हरलीन एरवी तिसऱ्या क्रमांकावर खेळते. त्यामुळे एखादी सलामीची फलंदाज लवकर बाद झाल्यास तिला नव्या चेंडूचा सामना करावा लागतो. हा अनुभव आता फायदेशीर ठरू शकेल, असे मितालीला वाटते.
उमा छेत्री : प्रमुख यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषच्या बोटाला दुखापत असून ती उपांत्य फेरीत खेळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात एकदिवसीय पदार्पण केलेल्या उमा छेत्रीला उपांत्य फेरीतही संधी मिळू शकेल. उमा प्रामुख्याने सलामीला खेळते. त्यामुळे तिच्याकडूनच डावाची सुरुवात करवून घेण्याबाबत भारतीय संघ विचार करू शकेल.
अमनजोत कौर : बांगलादेशविरुद्ध प्रतिकाला दुखापत झाल्यानंतर तिच्या जागी अमनजोत कौरला सलामीला पाठविण्यात आले. तिने आणि मनधानाने आक्रमक शैलीत खेळताना ५७ धावांची अभेद्य भागीदारीही रचली. यावेळी नव्या चेंडूविरुद्ध ती फारशी अडचणीत सापडली नाही. त्यामुळे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर सुरुवातीपासून दडपण टाकायचे झाल्यास पुन्हा अमनजोतला सलामीला खेळविण्याचा पर्याय भारतीय संघ अवलंबू शकेल.
