ICC Womens World Cup 2025, Team India Semifinal Scenario: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या २५ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यान या सामन्यानंतर कशी आहे गुणतालिकेची स्थिती? जाणून घ्या.
या सामन्यात अनेक महत्वाचे सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण गुंतागुंतीचं झालं आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर उर्वरीत २ स्थानांसाठी भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड या ३ संघांमध्ये कडवी झुंज सुरू आहे. इंग्लंडला सेमीफायनलमध्ये जाण्याची सोपी संधी आहे. कारण ३ पैकी केवळ १ सामना जिंकायचा आहे. तर चौथ्या स्थानासाठी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.
पाकिस्तानचे २ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा संघ तर या स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाला इथून पुढे ३ सामने खेळायचे आहेत. ४ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा संघ देखील ४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तानला अजूनही सेमीफायनल गाठण्याची संधी आहे. पण हा मार्ग मुळीच सोपा नसणार आहे.
भारतीय संघासाठी कसं असेल समीकरण?
भारतीय संघाला सेमीफायनल गाठण्याची संधी आहे. भारतीय संघाचे आणखी ३ सामने शिल्लक आहेत. त्यापैकी २ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवावा लागणार आहे. आज (१९ ऑक्टोबर) भारतीय संघाचा सामना इंग्लंडविरूद्ध होणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड आणि बांगलादेशविरूद्ध होणार आहे. या ३ पैकी २ सामने जिंकले तरीदेखील भारतीय संघ ८ गुणांपर्यंत पोहोचू शकतो आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. पण पावसाने हजेरी लावली, तर समीकरण आणखी गुंतागुंतीचं होऊ शकतं.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना निर्णायक ठरू शकतो. हा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. जर न्यूझीलंडने एकही सामना गमावला, तर भारतीय संघासाठी सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग आणखी सोपा होऊ शकतो. पण भारतीय संघाने पुढील तिन्ही सामने जिंकण्यावर भर द्यायला हवा.