ICC Womens World Cup 2025 Prize Money: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना २ नोव्हेंबरला नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम सामना खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. यासह दोन्ही संघांना पहिल्यांदाच जेतेपद पटकावण्याची संधी असणार आहे. दरम्यान अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळणार? जाणून घ्या.
महिला वर्ल्डकप स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला ४.४८ मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ३९.७ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला २.२४ मिलियन डॉलर्स म्हणजे १९.८ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. यासह सेमीफायनल गमावणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघालाही बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांना १.१२ मिलियन डॉलर्स म्हणजे ९.९ कोटी रूपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. तर साखळी फेरीतील संघांनाही बक्षीस दिलं जाणार आहे. प्रत्येक संघाला २.२५ कोटी रूपये म्हणजे २.२ कोटी रूपये दिले जाणार आहेत.
ऑस्ट्रेलियाला पराभूत करून टीम इंडिया अंतिम फेरीत
भारतीय संघाला सेमीफायनलचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरूद्ध पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला दणका देत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. त्यासाठी भारतीय संघाला विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करावा लागला.
स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना हा नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून लिचफील्डने दमदार शतकी खेळी केली. तर एलिस पेरीने अर्धशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३३९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून हरमनप्रीत कौरने दमदार ८९ धावांची खेळी केली. तर शेवटी जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद १२७ धावांची खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
