Ranji Trophy 2024-25 Shardul Thakur Reaction : भारतीय कसोटी सेटअपमधून शार्दुल ठाकूर अचानक कुठे गायब झाला हे कोणालाच माहीत नाही. दुखापत झाल्यानंतर, त्याने पुनर्वसनासाठी निश्चितच थोडा वेळ घेतला, परंतु आता असे दिसते की निवड समिती त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात आहेत आणि नितीश रेड्डीसारख्या खेळाडूंना संधी देत ​​आहेत. मात्र, या अष्टपैलू खेळाडूने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी चमकदार कामगिरी करत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यानंतर त्याने निवड समितीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यानंतर शार्दुल ठाकुरने अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीलाही कडक संदेश दिला आहे. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेसाठी भारतीय कसोटी संघात स्थान न मिळालेल्या ठाकूरने सांगितले की, खेळाडूंमध्ये ‘गुणवत्ता’ असेल तर निवडीसाठी त्यांच्या नावांचा विचार केला पाहिजे. रोहित-जैस्वालसारखे खेळाडू परतल्यानंतरही मुंबई संघाने ४७ धावांत ७ गडी गमावले होते, त्यानंतर शार्दुलने अर्धशतक झळकावत संघाला १२० धावांपर्यंत पोहोचवले. त्याच्या फलंदाजीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शार्दुल ठाकूर काय म्हणाला?

पहिल्या दिवसानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शार्दुल ठाकूर म्हणाला, “माझ्या गुणवत्तेबद्दल मी काय सांगू? इतरांनी याविषयी बोलायला हवे. कोणाकडे गुणवत्ता असेल तर त्याला अधिक संधी द्यायला हवीत. मला कठीण परिस्थितीत फलंदाजी करायला आवडते. सोप्या परिस्थितीत, प्रत्येकजण चांगले करतो, परंतु आपण प्रतिकूल परिस्थितीत कशी कामगिरी करतो हे महत्त्वाचे आहे. मी कठीण परिस्थितींकडे आव्हान म्हणून पाहतो आणि त्या आव्हानावर मात कशी करता येईल याचा नेहमी विचार करतो.”

कसोटी संघात स्थान न मिळण्याव्यतिरिक्त, ठाकूरला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयपीएलच्या मेगा लिलावात कोणताही खरेदीदार सापडला नाही, तरीही त्याने कबूल केले की या धक्क्यातून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. मुंबईने गुरुवारी रणजी करंडकातील एलिट ग्रुप ए सामन्यात जम्मू आणि काश्मीरविरुद्ध पहिल्या डावात आघाडी गमावली. वेगवान गोलंदाजांना अनुकूल विकेटवर नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करणे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाला महागात पडले. कारण मुंबईचा डाव अवघ्या १२० धावांत आटोपला आणि प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीरने पहिल्या दिवशी १७४ धावा केल्या आणि ५४ धावांची आघाडी घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If someone has quality he should be given more chances shardul thakur says selection committee after ranji trophy match vbm