IND vs AUS Australia Announced Playing XI for Sydney test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने संघात मोठा बदल केला आहे. त्यांनी फॉर्मात नसलेल्या अष्टपैलू मिचेल मार्शला संघातून वगळले आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने संघाची घोषणा करताना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कबाबतही अपडेटही दिले आहेत.
मिचेल मार्श संघाबाहेर
मिचेल मार्श या मालिकेत छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. त्याने चार कसोटी सामन्यांच्या सात डावात १०.४२ च्या सरासरीने केवळ ७३ धावा केल्या आहेत. या ७३ धावांपैकी त्याने पर्थ कसोटीत एकाच डावात ४७ धावा केल्या होत्या. तर गोलंदाजीतही मार्श फार चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने पर्थ कसोटीत ३ विकेट्स घेतले पण त्यानंतर तिन्ही कसोटीत एकही विकेट घेऊ शकला नाही.
हेही वाचा – IND vs AUS: सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू झाला संघाबाहेर; गौतम गंभीरने दिली माहिती
कोण आहे ३१ वर्षीय ब्यू वेबस्टर?
फॉर्मात नसलेल्या मिचेल मार्शच्या जागी ऑस्ट्रेलियाने ३१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टरला पदार्पण करण्याची संधी दिली आहे. त्याने ९३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३७.३९ च्या सरासरीने १४८ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये दोनदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम देखील केलेला आहे. या तस्मानियाच्या या अष्टपैलू खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३७.८३ च्या सरासरीने ५२९७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १२ शतकं आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे.
वेबस्टरने मार्च २०२२ पासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५७.१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर ३१.७ च्या सरासरीने ८१ विकेटही घेतले आहेत. गेल्या वर्षी, ३१ वर्षीय वेबस्टर हा वेस्ट इंडिजचे दिग्गज सर गारफिल्ड सोबर्स यांच्यानंतर शेफील्ड शिल्ड सीझनमध्ये ९०० धावा आणि ३० विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला. या मालिकेपूर्वी, त्याने मॅके येथील पहिल्या चार दिवसीय सामन्यात भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघासाठी नाबाद अर्धशतक केले आणि मेलबर्न सामन्याच्या दुसऱ्या डावात ३ विकेट घेतले.
यासह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सने सांगितले की, त्यांचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या सामन्यासाठी फिट घोषित करण्यात आला आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात कमिन्स संघर्ष करताना दिसला. संघ व्यवस्थापनाने बुधवारी स्टार्कला सावधगिरी म्हणून स्कॅनसाठी पाठवले, पण आता तो फिट असून सिडनी कसोटी खेळणार आहे.
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन जाहीर
सॅम कॉन्स्टस, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.
© IE Online Media Services (P) Ltd