Virat Kohli- Rohit Sharma: भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी अतिशय महत्वाचा होता. कारण दोन्ही फलंदाज ७ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. पण दोन्ही फलंदाज पहिल्याच सामन्यात फ्लॉप ठरले आहेत. रोहित शर्मा अवघ्या ८ तर विराट कोहली शून्यावर माघारी परतला. दरम्यान भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

मोहम्मद कैफच्या मते, विराट कोहली आणि रोहित शर्माने आधीच ऑस्ट्रेलियाला जायला हवं होतं. दोघांनीही लवकर ऑस्ट्रेलियाला जाणं टाळलं, याबाबत बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “विराट कोहली आणि रोहित शर्माकडे सुवर्णसंधी होती, पण त्यांनी संघासोबत जाणं ठरवलं. कारण त्यांना माहीत आहे की, लोकं आपल्यासोबत आहेत. विराट इंग्लंडमध्ये होता. त्यामुळे त्याच्यावर दबाव होता. तो जर परस्पर ऑस्ट्रेलियाला निघून गेला असता तर अडचणी वाढल्या असत्या. त्यामुळे तो फसला.”

विराट आणि रोहितची नेमकी चूक काय झाली? याबाबत बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “या दोघांनीही ८-१० दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाला जायला हवं होतं. तुम्ही कितीही मोठे फलंदाज असाल, पण क्रिकेट हा रिदमचा खेळ आहे. जर तुम्ही पूर्णपणे तयार नसाल तर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासमोर तुमचा निभाव लागणार नाही. म्हणून मला वाटतं की, आधी गेले असते तर बरं झालं असतं. रोहित अशा चेंडूवर पूल करून षटकार मारतो.”

मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट, रोहित आणि गिल हे तिन्ही फलंदाज फ्लॉप ठरले. तर केएल राहुलने ३८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या बळावर २६ षटकांअखेर भारतीय संघाने ९ गडी बाद १३६ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया डकवर्थ लुईस नियमानुसार १३१ धावा करायच्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने २२ व्या षटकात पूर्ण करत सामना खिशात घातला.