India Beat Australia by Five Wickets ICC Women’s World Cup 2025 Final: तब्बल ७ वेळा विश्वचषकावर नाव कोरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाला यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या टीम इंडियानं झोकात अंतिम सामन्यात प्रवेश केला. गेल्या ७ वर्षांपासून विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलसारख्या नॉकआऊट सामन्यात पराभवाची धूळ चारत भारताच्या लेकींनी ऐतिहासिक कामगिरी केली. या पार्श्वभूमीवर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रांमधून महिला क्रिकेट संघावर स्तुतिसुमनं उधळली जात असताना भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनं थेट ऑस्ट्रेलियाला ट्रोल केलं आहे!
Jemimah Rodrigues चं संयमी शतक!
नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या या उपांत्य सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियानं दिलेलं आव्हान ५ गड्यांच्या मोबदल्यात पार करून विजयश्री खेचून आणली. यात जेमिमा रॉड्रिग्जनं केलेल्या संयमी आणि आश्वासक शतकाचा सिंहाचा वाटा होता. साखळी सामन्यात भारतानं दिलेलं ३३१ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियानं सर करून विजय साजरा केला. त्यामुळे २०१७ सालापासून अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला या सामन्यातही विजय मिळवण्याचा विश्वास होता. पण भारतानं त्यांच्या याच विश्वासाला भेदत विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियाच्या याच अतिआत्मविश्वासावरून विरेंद्र सेहवागनं त्यांना ट्रोल केलं आहे.
महिला क्रिकेट संघाच्या विजयावर काय म्हणाला सेहवाग?
सेहवागनं आपल्या एक्स अकाऊंटवरून सेमीफायनल लढत संपल्यानंतर केलेल्या पोस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला लक्ष्य केलं आहे. “ऑस्ट्रेलियाचा संघ विचार करत होता की हा आणखी एक सेमी फायनलचा सामना आहे. आरामात जिंकुयात आणि फायनलमध्ये जाऊयात. पण आपल्या मुलींनी विचार केला की खरा धमाका करण्याची हीच खरी वेळ आहे. सगळ्या टीकाकारांना आपल्या खेळाडूंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. काय मस्त खेळलात! आपल्या महिला क्रिकेटपटूंचा अभिमान वाटतोय”, असं सेहवागनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कसा जिंकला भारतानं सेमीफायनल सामना?
ज्याप्रमाणे साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताच्या ३३१ धावांचा यशस्वीरीत्या पाठलाग केला होता, त्याचप्रमाणे सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३३९ धावांचं आव्हान भारताच्या महिला संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सोडलेले काही महत्त्वाचे झेल आणि भारतीय फलंदाजांनी दाखवलेलं धैर्य या गोष्टी विशेष उल्लेखनीय ठरल्या.
भरवश्याच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर व जेमिमा रॉड्रिग्ज यांनी दमदार वाटचाल सुरू केली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल १६७ धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत कौर वैयक्तिक ८९ धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या दीप्ती शर्मानं झटपट २४ धावा करून मोलाचं योगदान दिलं. मात्र, एक अशक्य धाव घेण्याच्या प्रयत्नात दीप्ती बाद झाली. त्यानंतर आलेल्या ऋचा घोषनं लौकिकाप्रमाणे फटकेबाजी करून भारताला विजयाच्या समीप नेलं. पण तीदेखील २६ धावांवर झेलबाद होऊन माघारी गेली. शेवटी अमनजोत कौरला साथीला घेऊन जेमिमा रॉड्रिग्जनं भारताचा विजय साकार केला.
भारताच्या विजयाचा मुकुटमणी…जेमिमा रॉड्रिग्ज
भारताच्या संपूर्ण फलंदाजीमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज एखाद्या अढळ वृक्षाप्रमाणे मैदानावर उभी होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा तिनं समाचार घेतला. त्यांचे सर्व चेंडू आपल्या कुशल फलंदाजीच्या जोरावर खेळून काढले. जवळपास ५० षटकं जेमिमा रॉड्रिग्ज खेळपट्टीवर उभी होती. तिनं १३४ चेंडूंमध्ये केलेल्या नाबाद १२७ धावा भारतीय विजयाचा कणा ठरल्या. समोरच्या बाजूला एकेक फलंदाज बाद होत असताना भारताला विजयाच्या सीमारेषेपार करण्याची जबाबदारी जेमिमानं आपल्या खांद्यांवर घेतली आणि एका बाजूला ती पाय रोवून उभी राहिली. अखेर तिच्या याच खेळीच्या जोरावर भारतानं आपला विजय साकार केला.
World Cup Final मध्ये द. आफ्रिकेशी सामना
आता अंतिम सामन्यात भारताची गाठ तुल्यबळ अशा द. आफ्रिकेशी होणार आहे. साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाप्रमाणेच द. आफ्रिकेनंदेखील भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे एकीकडे द. आफ्रिका संघाचं पारडं जड वाटत असतानाच भारतीय संघानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला सर्वच आघाड्यांवर चीत केल्यामुळे टीम इंडियाचाही आत्मविश्वास दुणावला असेल. त्यामुळे येत्या रविवारी २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ हिरीरीने खेळतील.
