भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज मोहालीमध्ये होणाऱ्या सामन्यात एक अनोखा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर करु शकतो. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजपासून सुरु होणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातच रोहित दोन चेंडूंमध्ये विक्रमवीरांच्या एका यादीत अव्वल स्थानी जाऊ शकतो. आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अ‍ॅरॉन फिंचच्या नेतृत्तवामध्ये भारतात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेचा श्रीगणेशा करणार आहे.

नक्की वाचा >> Ind vs Aus T20 Live Streaming: आजचा सामना नेमका किती वाजता सुरु होणार? लाइव्ह कुठे पाहा येणार? जाणून घ्या तपशील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

षटकांचा विचार करता क्रिकेटचं सर्वात छोटं स्वरुप मानलं जाणाऱ्या टी-२० प्रकारामध्ये रोहित शर्मा हा जगातील आघाडीचा खेळाडू आहे. आधीच हा विक्रम नावावर असलेल्या रोहितला या सामन्यात अजून एका विक्रमाला गवसणी घालता येणार आहे. भारतीय संघाकडून रोहित १३६ टी-२० सामने खेळला असून त्यात त्याने ३ हजार ६२० धावा केल्या आहेत.

आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी हिटमॅन नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या या क्रिकेटपटूने आतापर्यंत १७१ षटकार आणि ३२३ चौकार लगावला आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं षटकार लगावणारा रोहित हा केवळ दुसरा खेळाडू आहे. टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीमध्ये पहिलं स्थान मिळवण्याची संधी आजच्या सामन्यात रोहित शर्माकडे आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टीलच्या नावावर सध्या सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे.

गप्टीलच्या नावावर एकूण १७२ षटकार आहेत. त्याने केवळ १२१ सामन्यांमध्ये इतके षटकार लगावलेत. त्यामुळेच आजच्या सामन्यात रोहितने एक षटकार मारला तरी तो गप्टीलच्या विक्रमाशी बरोबरी करेल. जर दोन षटकार रोहितने लागवले तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा खेळाडू ठरेल.

सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीत गप्टील आणि रोहित वगळल्यास तिसऱ्या क्रमांकावर क्रिस गेल आहे. त्याने ७९ सामन्यांमध्ये १२४ षटकार लगावले आहेत. आकडेवारी पाहिल्यास गेल हा या दोघांपेक्षा बराच मागे आहे. त्या खालोखाल इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनचा क्रमांक या सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत लागतो. त्याने १२० षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करणाऱ्या फिंचने ११७ षटकार लगावले आहेत. तो या यादीत पाचव्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus t20 2022 rohit sharma 2 hits away from smashing martin guptill spectacular world record in t20i cricket scsg