IND vs ENG 1st test Day 5 Live Updates in Marathi: इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघावर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. भारताचा नवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. जेमी स्मिथने जडेजाच्या अखेरच्या षटकात २ षटकार आणि एका चौकारासह संघाला सहज विजय मिळवून दिला. बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी १८८ धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला.

जो रूटचं अर्धशतक

जो रूटने चौथ्या डावात ८४ चेंडूत ७ चौकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. इंग्लंडला आता विजयासाठी फक्त १५ धावांची गरज आहे. भारताची खराब फिल्डिंगचा संघाला सामन्यात मोठा फटका बसला आहे.

जडेजाच्या खात्यात पहिली विकेट

रवींद्र जडेजाने स्टोक्सला झेलबाद करवत संघाला पाचवी महत्त्वाची विकेट मिळवून दिली आहे. जडेजाच्या गोलंदाजीवर स्टोक्स सातत्याने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या स्वीप खेळण्यावरच जडेजाने त्याला अडकवलं. स्टोक्सने स्वीप खेळलेला चेंडू मागच्या बाजूला हवेत उडाला आणि स्लिपमध्ये असलेल्या गिलने हा झेल टिपला. आता इंग्लंडला विजयासाठी ६९ धावांची गरज आहे.

इंग्लंड विजयाच्या दिशेने

इंग्लंडचा संघ तिसऱ्या सत्रात विजयाच्या दिशेने अग्रेसर झाला आहे. जो रूट आणि बेन स्टोक्सची जोडी चांगली फलंदाजी करत आहे. दरम्यान इंग्लंडने ३०० धावांचा पल्ला गाठला असून संघाला विजयासाठी ७१ धावांची गरज आहे. तर भारताला ६ विकेट्सची गरज आहे.

टीब्रेकपर्यंत इंग्लंडने किती धावा केल्या?

पाचव्या दिवशी इंग्लंडने टीब्रेकपर्यंत ५८.३ षटकांत ४ विकेट्स गमावून २६९ धावा केल्या आहेत. प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांच्या २-२ विकेट्सच्या जोरावर भारताने ४ विकेट्स घेतले आहेत. आता तिसऱ्या सत्रात इंग्लंडला विजयासाठी १०२ धावांची गरज आहे.

लॉर्ड ठाकूरचे २ चेंडूत २ विकेट

शार्दुल ठाकूरने ५५व्या षटकात २ चेंडूत २ विकेट घेतले आहेत. शार्दुलने दुसऱ्या चेंडूवर बेन डकेटला झेलबाद केलं. तर तिसऱ्या चेंडूवर नुकताच आलेला हॅरी ब्रुक गोल्डन डकवर झेलबाद होत माघारी परतला. यासह सामन्याचा रोख पूर्णपणे बदलला आहे. जिथे भारताला विकेटसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत होती, तिथे संघाने आता झटपट विकेट मिळवले आहेत.

प्रसिधने मिळवून दिले विकेट

पावसाच्या उपस्थितीनंतर सामना पुन्हा सुरू झाला आहे. भारताला ४३व्या षटकात पहिली विकेट मिळाली आहे. प्रसिध कृष्णाने ४३व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर झॅक क्रॉलीला झेलबाद केलं. स्लिपमध्ये केएल राहुलने एक कमालीचा झेल टिपला. यासह क्रॉली १२६ चेंडूत ७ चौकारांसह ६५ धावा करत बाद झाला. तर त्याच्या स्पेलमधील पुढच्या षटकात त्याने ऑली पोपला क्लीन बोल्ड करत दुसरी विकेट मिळवून दिली.

सामना पंचांनी थांबवला

भारत इंग्लंड कसोटीच्या पाचव्या दिवशी पावसाने अखेरीस हजेरी लावली आहे. पावसाच्या उपस्थितीमुळे सामना अचानक थांबवण्यात आला आहे. सामना सुरू झाल्यापासून पावसाच्या हलक्या सरींना सुरूवात झाली होती, पण सामना सुरू होता. अखेरीस पावसाचा जोर वाढवल्याने सामना थांबवण्यात आला आणि कव्हर्स टाकण्यात आले. सामन्याचा आजचा अखेरचा दिवस असून सामना वेळेत सुरू झाला नाहीतर सामन्याची वेळ वाढवता येऊ शकते. ७.४५ पर्यंत इंग्लंडमध्ये चांगला सूर्यप्रकाश असतो. इंग्लंडला आता विजयासाठी १९९ धावांची गरज आहे.

बेन डकेटचं शतक

बेन डकेटने इंग्लंडसाठी चौथ्या डावात वादळी शतक झळकावलं आहे. डकेटने १२३ चेंडूत १४ चौकारांसह शतक पूर्ण केलं आहे. २०१० मधील एलिस्टर कुकच्या शतकानंतर चौथ्या डावात इंग्लंडकडून शतक करणारा बेन डकेट खेळाडू ठरला आहे. यासह डकेटचं हे कसोटीच्या दुसऱ्या डावातील पहिलं शतक आहे.

झॅक क्रॉलीचं अर्धशतक

इंग्लंडच्या सलामीवीरांची बॅझबॉल स्टाईल फलंदाजी सुरूच आहे. डकेटनंतर आता झॅक क्रॉलीने ११२ चेंडूत ६ चौकारांसह अर्धशतक पूर्ण केलं आहे. तर भारतीय संघ अजूनही पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत आहे.

लंचब्रेकपर्यंत इंग्लंडने किती धावा केल्या?

इंग्लंडने पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता ९६ धावा केल्या आहेत. त्यामुळे पहिलं सत्र पूर्णपणे इंग्लंडच्या नावावर राहिलं. बेन डकेट अर्धशतक पूर्ण करत ६४ धावा तर क्राऊली ४२ धावा करत नाबाद परतले आहेत. यासह आता इंग्लंडला विजयासाठी २५४ धावांची गरज आहे.

इंग्लंड १०० धावांच्या पार

बेन डकेट आणि झॅक क्राऊली यांनी चांगली फलंदाजी करत शतकी भागीदारी रचत संघाला १०० धावांच्या पार नेलं आहे. खेळपट्टीकडून गोलंदाजांना बिलकुल मदत नाही मिळत आहे. त्यामुळे भारताच्या गोलंदाजांची विकेटची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान बुमराह, सिराज यांनी चांगल्या स्पेल टाकल्या आहेत.

बेन डकेटचं अर्धशतक

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने दुसऱ्या डावात इंग्लंडला चांगली सुरूवात करून देत अर्धशतक केलं आहे. डकेटने ६६ चेंडूत ८ चौकारांसह अर्धशतकी खेळी केली.

इंग्लंडच्या क्राऊली-डकेटची अर्धशतकी भागीदारी

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यापासून भारतीय संघ विकेटच्या प्रतीक्षेत आहे. झॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी कमालीची फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी रचली आहे. तर इंग्लंडनेही ५० धावांचा टप्पा पार केला आहे.

चौथ्या दिवशी काय घडलं?

भारतीय संघ दुसऱ्या डावात ३६४ धावांवर सर्वबाद झाला. यासह भारताकडे ३७० धावांची आघाडी आहे आणि इंग्लिश संघाला पहिल्या कसोटीत विजयासाठी ३७१ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावाच्या तुलनेच भारताने दुसऱ्या डावात कमी धावा केल्या आहेत. आता गोलंदाजीत बुमराहव्यतिरिक्त भारताचे इतर गोलंदाज कशी कामगिरी करतात, यावर सर्वांच्या नजरा आहेत.