India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्या डावात ४७१ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव ३६४ धावांवर आटोपला आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघालाही चांगली सुरुवात मिळाली आहे. सामन्यातील शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५० धावांची गरज असणार आहे. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ब्रायडन कार्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी ३–३ गडी बाद केले. यादरम्यान इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूटने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
सामन्यातील चौथा दिवस केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी गाजवला. दोघांनी दमदार शतकं झळकावली. यादरम्यान क्षेत्ररक्षण करत असलेल्या जो रूटने मोठा कारनामा केला आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात जो रूटने शार्दुल ठाकूरचा झेल टिपताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याच्या रेकॉर्डमध्ये राहुल द्रविडची बरोबरी केली आहे.
राहुल द्रविड आणि जो रूट यांच्या नावे २१०–२१० झेल टिपण्याची नोंद आहे. पुढील सामन्यात एक झेल टिपताच जो रूटच्या नावावर मोठा रेकॉर्ड होऊ शकतो. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टिपणारा खेळाडू बनू शकतो.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टिपणारे खेळाडू
२१० – जो रूट (१५४ सामने)
२१० – राहुल द्रविड ( १६४ सामने)
२०५ – महेला जयवर्धने (१४९ सामने)
२०० – स्टीव्ह स्मिथ ( ११७ सामने)
२०० – जॅक कॅलिस ( १६६ सामने)
१०६ – रिकी पाँटिंग (१६८ सामने)
भारतीय संघाने ठेवलं ३७१ धावांचं आव्हान
या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना केएल राहुलने डावाची सुरूवात करताना १३७ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने ११८ धावांची खेळी केली.या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी १९५ धावा जोडल्या. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३६४ धावांचा डोंगर उभारला. यासह इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं.
इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांची गरज
या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडने चौथ्या दिवसाअखेर ६ षटकात २१ धावा केल्या आहेत. सलामीला आलेले बेन डकेट ९ तर जॅक क्रॉली १२ धावांवर नाबाद परतले.