Asia Cup 2025 IND vs PAK Handshake Controversy: आशिया चषकात पाकिस्तानचा संघ युएईविरूद्ध सामना खेळणार की बहिष्कार टाकणार, अशी चर्चा सुरू असतानाच बंद दरवाज्यामागे झालेल्या बैठकीनंतर अखेर पाकिस्तानचा संघ खेळण्यासाठी उतरला. पाकिस्तानने युएईविरूद्ध तासभर उशिराने सामना खेळण्यासाठी उतरला आणि विजय मिळवत सुपर फोरमध्ये धडक मारली. पण पाकिस्तान संघाने मैदानावर उतरण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नेमकं काय घडलं, याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊया.

शेवटच्या क्षणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) संघाला यूएईविरुद्धच्या सामन्यासाठी स्टेडियमकडे बसने रवाना होण्याची परवानगी दिली. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि सलमान नसीर यांनी संघाच्या वतीने चर्चा पुढे नेली, तर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी आयसीसीचं प्रतिनिधित्व केलं. या सर्व चर्चांमुळे सामना रात्री ८ वाजता सुरू होणार होता, तो तासभर उशिराने सुरू झाला.

शेवटी जेव्हा दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात हजर झाले, तेव्हा गेल्या चार दिवसांत सर्वाधिक चर्चेत असलेले सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट आधीच तिथे हजर होते. नाणेफेकीआधी बरंच नाट्य रंगलं; अनेक ईमेल्स, फोन कॉल्स, चर्चासत्रं आणि आरोप प्रत्यारोप झाले. मोहसिन नक्वी यांच्या नेतृत्वाखालील पीसीबी पायक्रॉफ्ट यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून सामनाधिकाऱ्यांच्या यादीतून हटवण्याच्या हट्टावर ठाम होते.

पीसीबीने १५ तारखेला आयसीसीला केला पहिला ईमेल

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, १५ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, पीसीबीने आयसीसीला पहिला ईमेल पाठवला. यात नाणेफेकीदरम्यान आचारसंहितेचं पालन केलं गेलं नाही, असं म्हटलं. दोन कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सलमान आघा यांनी प्रथेनुसार हस्तांदोलन केलं नाही, याबद्दल सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या भूमिकेवरच पीसीबीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावर आयसीसीने तातडीने चौकशी करण्याचं मान्य केलं आणि तपासानंतर पीसीबीला उत्तर दिलं की पायक्रॉफ्ट यांनी आपलं कर्तव्य नीट पार पाडलं असून त्यांनी कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं नाही.

पुढे स्पष्ट करण्यात आलं की, नाणेफेकीदरम्यान हस्तांदोलन न करण्याच्या सूचना अँडी पायक्रॉफ्ट यांना एसीसीकडूनच (ज्याचे अध्यक्ष नक्वी आहेत) मिळाल्या होत्या आणि त्यांनी त्या सूचनांनुसार काम केलं. आयसीसीने अधोरेखित केलं की पायक्रॉफ्ट यांनी परिस्थिती योग्यरित्या हाताळली आणि लाईव्ह टेलिकास्टदरम्यान कोणतीही अवघडलेली स्थिती निर्माण होऊ दिली नाही. मात्र, पीसीबी त्यांच्या उत्तरावर समाधानी नव्हते. त्यांनी पायक्रॉफ्ट यांना सामनाधिकाऱ्यांच्या यादीतून हटवण्याची मागणी केली आणि जर त्यांना पाकिस्तानच्या सामन्यांतून काढलं नाही तर स्पर्धेतून माघार घेऊ, असा इशारा दिला.

आयसीसी आपल्या भूमिकेवर ठाम

आयसीसी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि स्पष्ट केलं की पायक्रॉफ्ट यांनी कोणत्याही आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं नाही. तसेच कोणत्याही संघाच्या मागणीवरून अधिकृत अधिकारी बदलता येणार नाहीत, कारण यामुळे चुकीचा पायंडा पडेल. पीसीबीने माघार घेण्याची धमकी दिल्यानंतरही काही फरक पडला नाही. यानंतर एसीसीनेही अशीच विनंती केली, पण आयसीसीने पुन्हा आपली भूमिका बदलण्यास नकार दिला.

पाकिस्तानच्या नव्या ईमेलमुळे वादाला मिळालं वळण

दुबई कार्यालयातून हे प्रकरण हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने १६ सप्टेंबरलाच “पायक्रॉफ्ट प्रकरण” संपुष्टात आलं होतं. मात्र, १७ सप्टेंबरला पीसीबीकडून आलेल्या नव्या मेलमुळे या वादाला वेगळंच वळण मिळालं.

पहिल्या दोन दिवसांपर्यंत १५ आणि १६ सप्टेंबरला सगळी चर्चा फक्त नाणेफेकीदरम्यानच्या वादावरच होती. मात्र, १७ सप्टेंबरला पीसीबीने दावा केला की भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतरही आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे, आणि पुन्हा एकदा पायक्रॉफ्ट यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावर प्रत्युत्तर देताना आयसीसीने पीसीबीकडून अधिक माहिती मागितली आहे, पण त्यांना काहीही उत्तर मिळालेलं नाही.

पायक्रॉफ्ट यांनी पुढाकार घेत बैठकीसाठी बोलावलं

या वादाच्या पार्श्वभूमीवर, पायक्रॉफ्ट यांनी पुढाकार घेत पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा आणि मॅनेजर नविद अक्रम चीमा यांच्यासह बैठक बोलावली. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममधील मॅच रेफरी रूममध्ये ही बैठक झाली होती. या बैठकीसाठी प्रशिक्षक माईक हेसन देखील उपस्थित होते. पायक्रॉफ्ट यांनी झालेल्या संभाव्य गैरसमजाविषयी पाकिस्तानच्या तंबूसह चर्चा केली, असं समोर आलं आहे. मात्र पीसीबीच्या निवेदनात ज्याचा उल्लेख “माफी” असा केला गेला, त्यावर सूत्रांनी स्पष्टीकरण दिलं की, “इथे माफी मागण्याचा प्रश्नचच नव्हता, विशेषतः ज्या व्यक्तीची काहीही चूक नव्हती त्याच्याकडून.” या बैठकीचा व्हिडीओ देखील फिरत आहे, पण त्यातील आवाज म्यूट करण्यात आला आहे.

सहा ईमेल्स, प्रचंड गदारोळ, पण बदललं ते फक्त पाकिस्तान विरुद्ध यूएई सामन्याच्या सुरुवातीचं वेळापत्रक! पायक्रॉफ्ट यांनी हा सामना सुरळीत पार पाडला आणि ते उर्वरित स्पर्धेतही मॅच रेफरीची जबाबदारी सांभाळणार आहेत.