IND vs PAK Team India Player is Sick: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २३ फेब्रुवारीला क्रिकेटमधील हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोमाने तयारी करत आहेत. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. सामन्याच्या एक दिवस आधीच भारतीय संघाचा स्टार खेळाडू आजारी पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आजारी पडला आहे. ऋषभ पंतला दुबईमध्ये व्हायरल ताप येत असल्याची माहिती समोर आली आहे. पंतच्या आजारपणामुळे टीम इंडिया चिंतेत आहे, कारण सामन्यादिवशी संघाकडे केवळ एकच यष्टीरक्षक असणार आहे.

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या मोठ्या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल याने पंतबद्दल ही माहिती दिली. शनिवारी २२ फेब्रुवारीला टीम इंडियाच्या सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत शुबमन गिलने पंत अचानक आजारी पडल्याचा खुलासा केला, ज्यामुळे तो सराव सामन्यामध्ये सहभागी होऊ शकला नाही. भारतीय उपकर्णधाराने सांगितले की, पंतला व्हायरल ताप आहे, त्यामुळे त्याला या सराव सत्रातून विश्रांती देण्यात आली आहे.

आता रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी पंत तंदुरुस्त होणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, पंतच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही फरक पडेल असं वाटत नाही, कारण केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सामन्यात खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने ही त्याने जबाबदारी घेत ४१ धावांची चांगली खेळी केली. राहुलने विजयी षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे पंतला दुसऱ्या सामन्यातही स्थान मिळेल अशी शक्यता कमी आहे.

तरीही पंत आजारी पडणं ही टीम इंडियासाठी तणावाची बाब असणार आहे, कारण सामन्यापूर्वी किंवा सामन्यादरम्यान राहुलसाठी बॅकअप म्हणून ऋषभ पंतचे तिथे उपस्थित असणं महत्त्वाचं आहे. या दोघांशिवाय भारतीय संघात तिसरा कोणताही यष्टिरक्षक नाही.

विश्वचषक २०२३ नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना आहे, तर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया चषक २०१८ नंतर ते प्रथमच या फॉरमॅटमध्ये एकमेकांविरूद्ध खेळताना दिसणार आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत दोन सामने झाले आहेत आणि दोन्ही सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak rishabh pant down with viral fever misses training before pakistan clash champions trophy bdg