IND vs PAK Shoaib Malik : विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध ६ गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. गेल्या काही दिवसांपासून फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर त्याचं शतकही पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी ४९.४ षटकांत २४१ धावांवर पाकिस्तानचे सर्व फलंदाज बाद करत त्यांचा डाव संपुष्टात आणला. कुलदीप यादवने ९ षटकांत ४० धावा देत ३ बळी घेतले. तर, ८ षटकांत ३१ धावा देत २ बळी घेतले. यासह रवींद्र जडेजा, हर्षित राणा व अक्षर पटेलने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानचा डाव संपल्यानंतर २४२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. मात्र कर्णधार रोहित शर्मा १५ चेंडूत २० धावा करून बाद झाला. त्यानंतर, सलामीच्या सामन्यातील शतकवीर शुभमन गिल (५२ चेंडूंत ४६) आणि विराट कोहली या दोघांनी भारताचा डाव सावरला. संथ खेळपट्टी आणि मैदानावर वेगाने धावा करणे अवघड असल्याचे या दोघांनी लक्षात घेतले. त्यांनी एक-दोन धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी रचत भारताला शतक गाठून दिले. अहमद अबरारने गिलला बाद केल्यावर विराटने (६७ चेंडूंत ५६) श्रेयस अय्यरच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ११४ धावांची निर्णायक भागीदारी रचत भारताला विजयासमीप नेले. श्रेयस बाद झाल्यानंतर कोहलीने औपचारिकता पूर्ण करताना भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करत आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले.

शोएब मलिक म्हणाला, “दिल के अरमां आंसुओं में बह गए”

भारताच्या या विजयानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. तर पाकिस्तानी क्रिकेटरसिकांची निराशा झाली आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी देखील या पराभवानंतर पाकिस्तानी संघाबाबतची त्यांची नाराजी प्रकट केली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने पाकिस्तानच्या पराभवानंतर त्याचा मित्र व पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकला विचारलं की या “सामन्यावर तुझी प्रतिक्रिया काय?” त्यावर शोएब मलिकने एक जुनं हिंदी गाणं गायलं. तो म्हणाला, “दिल के अरमां आँसुओं में बह गए| हम वफ़ा करके भी तनहा रह गए| दिल के अरमां आँसुओं में बह गए| तसेच त्यांचे इतर साथीदार म्हणाले की “आम्हाला (पाकिस्तानी क्रिकेटरसिक) आता अशा पराभवांची सवय झाली आहे”.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak shoaib akhtar shoaib malik unhappy as pakisatn defeated sings dil ke arman ansuon men bah gaye asc