Yashasvi Jaiswal Catch Video: भारत आणि वेस्ट या दोन्ही संघांमधील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील तिन्ही दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलायला पाहायला मिळाला आहे. दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवल्यानंतर आता तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वेस्टइंडिजच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या वेस्टइंडिजचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर यशस्वी जैस्वाल आपल्या फलंदाजीसह क्षेत्ररक्षणासाठी चर्चेत आला होता. या दौऱ्यावर त्याने बरेच सोपे कॅचही सोडले होते. पण यावेळी त्याने समोरच्या दिशेने डाईव्ह मारून भन्नाट कॅच घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यशस्वी जैस्वालचा भन्नाट कॅच

तर झाले असे की, भारतीय संघाची दुसऱ्या डावातील गोलंदाजी सुरू असताना रवींद्र जडेजा २१ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्यावेळी शे होप स्ट्राईकवर होता. रवींद्र जडेजाने राऊंड द विकेटचा मारा करताना ऑफ स्टंपच्या बाहेरच्या लाईनवर चेंडू टाकला. हा चेंडू टप्पा पडताच उसळला. त्यामुळे शे होपला चेंडूचा अंदाज घेता आला नाही. होपने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सरळ यशस्वी जैस्वालच्या हातात गेला. त्याने समोरच्या दिशेने डाईव्ह करून भन्नाट कॅच घेतला.

वेस्टइंडिजचे ५ फलंदाज तंबूत

भारतीय गोलंदाजांनी वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ४४८ धावा करून डाव घोषित केला. यासह भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या वेस्टइंडिजचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. दरम्यान वेस्टइंडिजवर १ डावाने पराभवाचं संकट ओढावलं आहे. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना केएल राहुलने १००, कर्णधार शुबमन गिलने ५०, ध्रुव जुरेलने १२५ आणि रवींद्र जडेजाने नाबाद १०४ धावांची खेळी केली.