India vs West Indies 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. सुरूवातीचे २ दिवस फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडल्यानंतर, तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी विकेट्सची रांग लावली आहे. भारताकडून कुलदीप यादवने दमदार गोलंदाजी केली आहे. दरम्यान कुलदीपने शे होपला बाद करण्यासाठी भन्नाट चेंडू टाकला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी ४ गडी बाद १४० धावा केल्या होत्या. वेस्टइंडिजला सुरूवात चांगली मिळाली होती. पण भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केल्यांनंतर विकेट्सची रांग लागली.

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर शे होपची बत्तीगुल

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना ५० वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला. या षटकातील तिसरा चेंडू टप्पा पडून सरळ राहिला. शे होपने पुढचा पाय काढला पण बॅट येण्याआधीच चेंडू यष्टीला जाऊन धडकला. शे होप ३६ धावा करत माघारी परतला. शे होपने एक बाजू धरून ठेवली होती. पण कुलदीप यादवने त्याला बाद करत माघारी धाडलं.

भारतीय संघाने उभारला ५१८ धावांचा डोंगर

या सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या केएल राहुलने ३८ धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने १७५ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शनने ८७ धावांची खेळी केली. कर्णधार शुबमन गिलने नाबाद १२९ धावा केल्या. नितीश कुमार रेड्डी ४३ धावांवर माघारी परतला. तर ध्रुव जुरेलने ४४ धावांची खेळी केली. भारतीय संघाने पहिला डाव ५ गडी बाद ५१८ धावांवर घोषित केला.