Rohit Sharma In DY Patil Stadium: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरू आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान तिसऱ्यांदा वर्ल्डकप फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी वर्ल्डकप विजेता कर्णधार रोहित शर्माने डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे.
रोहित शर्माची डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये एंट्री
भारतीय महिला संघाने तिसऱ्यांदा वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. कारण ही वर्ल्डकप स्पर्धा भारतात सुरू आहे. घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाला क्रिकेट चाहत्यांचा चांगला सपोर्टही मिळत आहे. दरम्यान या सामन्याच्या सुरूवातीला मास्टर- ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन मैदानात एंट्री केली. त्यानंतर रोहित शर्मादेखील भारतीय महिला संघातील खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी मैदानात दाखल झाला. हिटमॅनचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालेला रोहित काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका खेळताना दिसून आला होता. या दौऱ्यावरील शेवटच्या सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी केली. आता येत्या काही दिवसात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिका पार पडणार आहे. या मालिकेत रोहित पुनरागमन करताना दिसून येऊ शकतो.
भारतीय संघाने उभारला २९८ धावांचा डोंगर
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या स्मृती मानधनाने ४५ तर शफाली वर्माने ८७ धावांची खेळी केली. सेमीफायनल सामन्यातील हिरो जेमिमा रॉड्रिग्ज या सामन्यात २४ धावांवर माघारी परतली. तर हरमनप्रीत कौरने २०, दीप्ती शर्माने ५८, अमनजोत कौरने १२, रिचा घोषने ३४ आणि राधा यादवने ३४ धावांची खेळी केली. भारताने ५० षटकांअखेर २९८ धावा केल्या आहेत.
दीप्ती- शफालीचं दमदार अर्धशतक
या सामन्यात शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. या जोडीने भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना ४५ धावा करून माघारी परतली. पण त्यानंतर शफाली वर्माने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तिचं शतक अवघ्या १३ धावांनी हुकलं. शफाली ८७ धावा करून माघारी परतली. शेवटी दीप्ती शर्माने ५८ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २९८ धावांपर्यंत पोहोचवली.
