Rucha Ghosh Record: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडला. या सामन्यात फलंदाजी करताना ऋचा घोषच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघ अडचणीत असताना तिने ७७ चेंडूंचा सामना करत ९४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ११ चौकार आणि ४ षटकार खेचले. तिचं शतक अवघ्या ६ धावांनी हुकलं पण तिच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

या सामन्यातील पहिल्या डावातील शेवटच्या षटकात ऋचा घोष शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. या षटकात तिने लागोपाठ चौकार मारले. षटकातील चौथ्या चेंडूवर तिने षटकार मारण्याच्या प्रयत्न केला. मात्र षटकार मारण्याच्या प्रयत्नात ती बाद होऊन माघारी परतली.

दरम्यान ती वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाकडून सर्वात मोठी खेळी करणारी यष्टिरक्षक फलंदाज ठरली आहे. या विक्रमात तिने फौजीह खलील यांना मागे टाकलं आहे. फौजीह यांनी १९८२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना ८८ धावांची खेळी होती. तर अंजू यांनी १९९३ मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध खेळताना ८४ धावांची खेळी केली होती. या यादीत ती आता अव्वल स्थानी पोहोचली आहे.

या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय महिला संघाचा डाव पूर्णपणे फसला होता. अवघ्या १०२ धावांवर संघातील ६ फलंदाज माघारी परतले होते. पण त्यानंतर ऋचा घोष आणि स्नेह राणा यांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. स्नेह राणाने २४ चेंडूत ३३ धावा चोपल्या. तर ऋचा घोषने ९४ धावांची खेळी केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संंघाकडून स्मृती मान्धना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी १०.२ षटकात ५५ धावा जोडल्या. मान्धना २३ धावा करत माघारी परतली. तर प्रतिकाने ३७ धावांची खेळी केली. या दोघांना वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला योगदान देता आलं नाही. पण शेवटी ऋचा घोषने भारतीय संघाची धावसंख्या २५१ धावांवर पोहोचवली. भारतीय संघाचा डाव लवकर आटोपला असता, पण ऋचा घोष शेवटपर्यंत उभी राहिली, त्यामुळे भारतीय संघाने २५० धावांचा पल्ला गाठला.