पाकिस्तानविरुद्धची लढत नेहमीच चुरशीची असते. त्यांना आम्ही पराभूत करीत आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा जिंकली व त्यामध्ये गोलरक्षक म्हणून माझा खारीचा वाटा होता. हे विजेतेपद माझ्यासाठी संस्मरणीय ठरले आहे, असे भारतीय संघाचा गोलरक्षक आकाश चिकटे याने ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीला सांगितले.

मलेशियात नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळविताना अंतिम फेरीत पाकिस्तानला ३-२ असे हरविले होते. या सामन्यात भारताचा सर्वात अनुभवी गोलरक्षक पी.आर.श्रीजेश हा जखमी असल्यामुळे खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी गोलरक्षणाची जबाबदारी आकाशकडे सोपविण्यात आली होती. त्याने ही जबाबदारी आत्मविश्वासाने झेलली.

अंतिम सामन्यात पाकिस्तानबरोबर खेळताना दडपण होते का असे विचारले असता आकाश म्हणाला, पाकिस्तानला आम्ही या स्पर्धेतील साखळी लढतीत ३-२ याच फरकाने हरविले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात विजय मिळविण्याची आम्हाला खात्री होती. तरीही अंतिम सामन्याचे थोडेसे दडपण होतेच. मायदेशी आपले चाहते दीपावली साजरी करीत असताना त्यांना निराश करायचे नव्हते. शेवटपर्यंत जिद्दीने खेळ करीत हॉकीच्या मैदानावर दीपोत्सवच साजरा करण्याचे आमचे ध्येय होते.

आकाश पुढे म्हणाला, श्रीजेश खेळणार नाही व गोलरक्षणाची जबाबदारी माझ्याकडे दिली जाणार आहे असे आमचे प्रशिक्षक रोलँन्ट ओल्टमन्स यांनी मला सांगितल्यानंतर माझ्यावर कोणतेही दडपण आले नाही. उलट माझ्यापुढे ते एक आव्हानच आहे असे मनात आणून मी त्यादृष्टीनेच विचार केला. पाकिस्तानच्या खेळाडूंची शैली आम्हाला माहीत होती. फक्त अंतिम सामन्यात त्यांच्याविरुद्ध थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे हे ठरवित मी त्यादृष्टीने नियोजन केले. सुदैवाने संघातील सर्व सहकाऱ्यांनी मला खूप मोलाची साथ दिली. जरी आमच्याविरुद्ध त्यांना पेनल्टी कॉर्नर देण्यात आला. त्यावेळीही मी आत्मविश्वासाने गोलरक्षण केले. या स्पर्धेतील तीन साखळी सामन्यांमध्ये मी गोलरक्षण केले होते. त्याचाही फायदा मला अंतिम फेरीच्या वेळी झाला. अंतिम सामन्यापूर्वी श्रीजेश यानेही मला खूप मौलिक सूचना केल्या व त्याचाही मला फायदा झाला.

ओल्टमन्स यांच्या प्रशिक्षणाच्या शैलीविषयी आकाश म्हणाला, ओल्टमन्स हे अतिशय महान प्रशिक्षक आहेत. अंतिम सामन्यापूर्वी मला त्यांनी खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन केले. संघातील प्रत्येक खेळाडूच्या शैलीबरोबरच गुणदोषांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला आहे तसेच स्वभाववैशिष्टय़ेही त्यांना माहीत आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला ते वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करीत असतात. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचाही त्यांनी अतिशय बारकाईने अभ्यास केला आहे. त्याचा लाभ आम्हाला सरावाच्या वेळी होत असतो. संघातील खेळाडू व प्रशिक्षक यांच्यात चांगला सुसंवाद त्यांनी निर्माण केला आहे.

आकाश हा यवतमाळ येथील खेळाडू आहे. शालेय स्तरावरील स्पर्धामध्ये सातत्यपूर्ण कामगिरीनंतर पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये त्याची निवड झाली. तेथे त्याला माजी ऑलिम्पिकपटू अजित लाक्रा यांचे मार्गदर्शन मिळाले. तो सध्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप संघाकडून खेळत आहे. या संघाचे प्रशिक्षक सागरसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाचाही त्याला फायदा झाला आहे.

ऐन दिवाळीत परदेशात खेळावयास लागल्यामुळे नाराज झाला काय असे विचारले असता आकाश म्हणाला, आम्हाला अशा प्रसंगांची सवय झाली आहे. आमच्या दृष्टीने संघास विजय मिळवून देणे हीच आमची दिवाळी असते असे आम्ही मानत आलो आहोत.

हॉकी महाराष्ट्रातर्फे आकाशाचे स्वागत

भारतीय संघास विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या आकाश चिकटे या महाराष्ट्राच्या खेळाडूचे येथील विमानतळावर हॉकी महाराष्ट्रातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हॉकी महाराष्ट्राचे सरचिटणीस मनोझ भोरे, बॉम्बे इजिनिअरिंग ग्रुपचे प्रशिक्षक सागरसिंग ठाकूर, तसेच सौरवसिंग रजपूत, रोहन जावळे, निखिल जाधव आदी उपस्थित होते.

टोकियो ऑलिम्पिकपर्यंत ओल्टमन्स यांना मुदतवाढ

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांच्या करारात २०२० टोकियो ऑलिम्पिकपर्यंत मुदतवाढ करण्यात येणार आहे. मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी ओल्टमन्स यांनी तीन वर्षे उच्च कामगिरी संचालकाची जबाबदारी पार पाडली होती.

गेल्यावर्षी पॉल व्हॅन अ‍ॅस यांच्या हकालपट्टीनंतर ओल्टमन्स यांच्याकडे प्रशिक्षकाची धुरा सोपविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने अझलन शाह चषक स्पध्रेत रौप्य, तर गत आठवडय़ात पार पडलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत सुवर्णपदक पटकावले. तसेच रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

‘ओल्टमन्स यांचा करार २०२० टोकियो ऑलिम्पिकपर्यंत वाढवण्यात यावा, अशी विनंती करणारे पत्र हॉकी इंडियाकडून आम्हाला मिळाले आहे. भारतीय संघाची प्रगती आणि त्यांची कामगिरी पाहता करार वाढवण्यात आम्हाला काही हरकत नाही. त्यामुळे आम्ही मंत्रालयाकडे तसा अर्ज पाठवला आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे,’ असे भारतीय क्रीडा प्राधिकारणातील (साइ) सूत्रांनी सांगितले. ‘कराराचे नूतनीकरण झाल्याचे मला कळले. परंतु, अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही,’ असे ओल्टमन्स यांनी सांगितले.