ढाका : तिरंदाजीमधील रिकर्व्ह प्रकारात भारतीय पुरुष तिरंदाजांनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील १८ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणताना बलाढ्य कोरिया संघावर शूटऑफमध्ये मात करून सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच वेळी अंकिता भकत आणि धीरज बोम्मादेवरा यांनी वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले.

यशदीप भोगे, अतानू दास आणि राहुल या भारतीय त्रिकुटाने २-४ अशी पिछाडी भरून काढताना ४-४ अशी बरोबरी पत्करली आणि त्यानंतर शूट ऑफमध्ये बाजी मारताना ५-४ अशा फरकाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कोरियाचा सेओ मिंगी, किम येचान आणि जंग जिहो हा संघ २००९ पासून सातत्याने सुवर्णपदकाचा मानकरी ठरत आला आहे. त्यांची ही मक्तेदारी भारतीय संघाने मोडून काढली.

शूटऑफमध्ये देखील बरोबरीची कोंडी फुटली नव्हती. दोन्ही संघांनी २९ गुणांची कमाई केली, मात्र वैयक्तिक स्पर्धेत अपयशी ठरलेल्या अतानुने १० गुणांचा अचूक वेध घेतल्याने कोरियाला पराभवाचा सामना करावा लागला.

अंकिताने कारकीर्दीमधील सर्वात मोठा विजय मिळविताना ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या कोरियाच्या नाम सुह्येऑन हिचा ७-३ असा पराभव केला. पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात अंतिम फेरीत धीरजने एकतर्फी लढतीत राहुलचा ६-२ असा पराभव करून सुवर्णपदक मिळविले.