सामन्यात कोणत्याही क्षणी खेळास कलाटणी देण्याची व बलाढय़ संघांना अनपेक्षित पराभवाचा धक्का देण्याची क्षमता भारतीय हॉकीपटूंकडे आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गाफील राहता येत नाही असे ऑस्ट्रेलियाचे साहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहॅम रीड यांनी येथे सांगितले.
जागतिक हॉकी लीग स्पर्धेला १० जानेवारीपासून प्रारंभ होत असून त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. साखळी ‘ब’ गटात ऑस्ट्रेलियाला अर्जेन्टिना, बेल्जियम व नेदरलँड्स यांच्याशी खेळावे लागणार आहे. ‘अ’ गटात यजमान भारताला इंग्लंड, जर्मनी व न्यूझीलंड यांच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.  
रीड म्हणाले, बेल्जियम, जर्मनी व नेदरलँड्स यांच्या खेळाशी आम्ही परिचित आहोत मात्र भारतीय संघाविषयी अंदाज बांधणे कठीण असते. भारतीय खेळाडूंच्या शैलीविषयी बारकाईने अभ्यास करणेही सोपे नसते. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध खेळताना सावध चाली कराव्या लागतात. मात्र अव्वल दर्जाचे यश मिळविण्याची आम्हाला खात्री आहे. येथे सामने खेळण्यासाठी आम्ही उत्सुक झालो आहोत. येथे सर्वोत्तम कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मार्क नॉलेस याने सांगितले.