क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आपण आपल्या कारकिर्दीत एकदा कसोटी संघाचं प्रतिनिधीत्व करावं. भारतीय संघही बुधवारपासून श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. गॅलेच्या मैदानात उद्या पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपला कसोटी संघाची जर्सी घातलेला फोटो शेअर केला आहे.

लहानपणापासून जे स्वप्नं मी पाहत होतो, ते आज पूर्ण होताना दिसतंय, माझ्यापेक्षा यापेक्षा आनंदाचा दिवस कोणता असू शकेल, अशा आशयाचं ट्विट पांड्याने केलेलं आहे.

चॅम्पियन्स करंडकात हार्दिक पांड्या चांगल्या फॉर्मात होता. अंतिम फेरीज ज्यावेळी भारताच्या रथी-महारथींनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले अशावेळी फक्त हार्दिक पांड्याने पाकिस्तानी आक्रमणाचा सामना केला होता. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातही पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत आपली कमाल दाखवली होती. याच कामगिरीच्या आधारावर पांड्याची अष्टपैलू खेळाडू म्हणून श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

भारतीय संघाची झालेली निवड पाहता पांड्याला संघात जागा मिळेल याची शक्यता कमीच आहे. मात्र पहिल्या कसोटी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने तरुण खेळाडूंना योग्य वेळी संघात जागा दिली जाईल असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी कसोटी सामन्यांमध्ये पांड्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.