तिन्ही सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून भारतीय संघाने मालिका सहजपणे खिशात टाकली असून श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी त्यांना प्रयोग करण्याची नामी संधी असेल. दुसरीकडे पराभवाच्या गर्तेत सापडलेला श्रीलंकेचा संघ पहिल्यावहिल्या विजयासाठी आसुसलेला असून आता फक्त प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना जिंकावे लागणार आहे.
सलामीसाठी उथप्पा की रोहित?
शिखर धवनला अखेरच्या दोन्ही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आल्यामुळे सलामीवीराची एक जागा रिकामी आहे, तर एका जागेवर अजिंक्य रहाणेने आपले स्थान जवळपास भक्कम केले आहे. धवनच्या जागी रॉबिन उथप्पा किंवा रोहित शर्मा यांना सलामीला येण्याची संधी मिळू शकते. जर उथप्पा सलामीला आला तर मधल्या फळीसाठी रोहित शर्माचे नाव जवळपास निश्चित समजले जात आहे. पण स्थानिक स्पर्धामध्ये फॉर्मात असलेल्या केदार जाधवलाही या वेळी संधी देण्यात येऊ शकते. सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्या स्थानांना मात्र या वेळी धक्का लावण्यात येणार नाही.या संघात एकही यष्टिरक्षक नसल्याने ही जबाबदारी रॉबिन उथप्पा किंवा अंबाती रायुडू यांच्यावर येऊ शकते. उथप्पा आणि रायुडू या दोघांनीही आयपीएलमध्ये यष्टीरक्षण केले आहे.
कर्ण शर्माला पदार्पणाची आशा
युवा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला पदार्पणाची संधी दिली असली तरी त्याला सातत्याने खेळवण्यात आलेले नाही. त्यामुळे या सामन्यात मोठे गोलंदाज नसताना धवलला संधी मिळू शकते. ‘लेग स्पिनर’ कर्ण शर्माला आतापर्यंत पर्यटक म्हणून फिरावे लागत आहे. पण या सामन्यात एका फिरकीपटूला विश्रांती देऊन कर्णला संधी मिळू शकते.
श्रीलंकेला गोलंदाजीची चिंता
गोलंदाजी ही श्रीलंकेसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. श्रीलंकेच्या एकाही गोलंदाजाला आतापर्यंत भेदक मारा करता आलेला नाही. त्यामुळे जर त्यांना सामना जिंकायचा असेल तर त्यांना गोलंदाजीवर कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज वगळता एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मध्यमगती गोलंदाज न्युवान कुलसेकरा आणि फिरकीपटू अजंठा मेंडिस यांना आतापर्यंत जास्त संधी देण्यात आलेली नाही. अशन प्रियंजनसारख्या युवा गोलंदाजाचा चांगला वापर संघाला करता आलेला नाही.
फलंदाजीमध्ये सातत्य नाही
श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगला अनुभव असला तरी एकालाही कामगिरीत सातत्य राखण्यात यश आलेले नाही, त्याचबरोबर एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आलेली नाही. कुमार संगकारा, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान या त्रिकुटाने एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले असले तरी त्यांना या मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर दिनेश चंडिमल, कुशल परेरा यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव असला तरी त्यांच्या धावा या मालिकेत आटलेल्या दिसत आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, आर. अश्विन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, विनय कुमार, स्टुअर्ट बिन्नी, कर्ण शर्मा, अक्षर पटेल आणि केदार जाधव.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकत्ने दिलशान, लाहिरू थिरीमाने, महेला जयवर्धने, दिनेश चंडिमल, अशन प्रियंजन, निरोशान डिकवेला, थिसारा परेरा, न्युवान कुलसेकरा, लाहिरू गमगे, चतुरंगा डीसिल्व्हा, सीक्युगे प्रसन्ना, अजंठा मेंडिस आणि शामिंडा इरंगा.
सामन्याची वेळ : दु. १.३० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.
विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे आता गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे मैदानात सातत्यपूर्ण कामगिरीवर भर द्यायला हवा. सुरुवातीपासूनच प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला प्रेरणा देणे अवघड काम राहिलेले नाही.
– विराट कोहली, भारताचा कर्णधार
जेव्हा तुम्ही मोठय़ा स्पर्धेची तयारी करत असता तेव्हा तुमच्याकडे विजयाची भूक असायला हवी. आमच्या संघामध्ये ही गोष्ट नक्कीच आहे. मोठय़ा स्पर्धेचे दडपण कसे हाताळायचे, हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. बऱ्याच कालावधीपासून आम्ही विश्वचषकावर लक्ष केंद्रित केले असून त्याचाच विचार करत आहोत. संघातील काही गोष्टी योग्य होत नसल्या तरी त्यासाठी घाबरण्याचे काही कारण नाही.
– महेला जयवर्धने, श्रीलंकेचा फलंदाज