भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला आहे. टॉम लॅथम आणि विल यंग यांनी बिनबाद १२९ धावांवरून आज पुढे फलंदाजीला सुरुवात केली. पण भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या योगदानामुळे न्यूझीलंडचा अर्धा संघ गारद झाला. यंग आणि लॅथम या दोघांना शतकाने हुलकावणी दिली. अक्षरने पाच बळी टिपत न्यूझीलंडच्या डावाला सुरूंग लावला. भारताने आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली असून शुबमन गिल (१) स्वस्तात माघारी परतला आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने १ बाद १४ धावा केल्या असून भारताकडे ६३ धावांची आघाडी आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने गिलचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. चेतेश्वर पुजारा ९ तर मयंक अग्रवाल ४ धावांवर नाबाद आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूझीलंडचा पहिला डाव

न्यूझीलंडसाठी टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी न देता दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत फलंदाजी केली. तिसऱ्या दिवशी यंगचे शतक हुकले. दीडशे धावांची भागीदारी ओलांडल्यानंतर फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने यंगला यष्टीपाठी झेलबाद केले. यंगने १५ चौकारांसह ८९ धावा केल्या. त्यानंतर कप्तान केन विल्यमसनसह लॅथम उभा राहिला. वैयक्तिक १८ धावांवर असताना विल्यमसनला वेगवान गोलंदाज उमेश यादवने पायचीत पकडले. लंचनंतर अक्षर पटेलने आपल्या फिरकीत तीन फलंदाजांना अडकवले. त्याने रॉस टेलर (११), हेन्री निकोल्स (२) आणि सलामीवीर लॅथमला (९५) तंबूत पाठवले. साहाच्या बदली खेळत असलेल्या श्रीकर भरतने उत्कृष्ट यष्टीरक्षण करत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने लॅथमला यष्टीचीत केले. लॅथमने १० चौकारांसह ९५ धावा केल्या. नंतर आलेला रचिन रवींद्र जडेजाचा बळी ठरला. अक्षरने टॉम ब्लंडेल आणि त्यानंतर टिम साऊदीला बाद करत आपले पाच बळी पूर्ण केले. अश्विनने विल सोमरविलेला बाद करत न्यूझीलंडचा पहिला डाव १४२.३ षटकात २९६ धावांवर संपुष्टात आणला. अश्विनने ३ बळी घेतले.

भारताचा पहिला डाव

भारताचा पहिला डाव १११.१ षटकात ३४५ धावांवर आटोपला. सलामीवीर शुबमन गिलची ५२ धावांची खेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. गिलने पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात न्यूझीलंडवर हल्लाबोल चढवला. गिलने ५ चौकार आणि एका षटकार ठोकला. वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने त्याला बोल्ड केले. गिलचा सहकारी मयंक अग्रवाल (१३) स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आलेले चेतेश्वर पुजारा (२६), कर्णधार अजिंक्य रहाणे (३५) यांनी छोटेखानी खेळी करत भारतासाठी धावा जोडल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. या दोघांनी १२१ धावांची भागीदारी रचली. श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात छाप सोडली आणि नाबाद शतक झळकावले. तर जडेजाने ५० धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने जडेजाला लवकर माघारी धाडले. जडेजाने ६ चौकारांसह ५० धावा केल्या. त्यानंतर अय्यरने वृद्धिमान साहाला सोबत घेत धावा जोडल्या. अय्यरने जेमीसनच्या गोलंदाजीवर शतक झळकावले. पदार्पणात शतक झळकावणारा श्रेयस १६वा भारतीय ठरला. पुढच्या दोन षटकात भारताने साहाला (१) गमावले. साऊदीने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. भारताच्या तीनशे धावा फलकावर लागल्यानंतर श्रेयस माघारी परतला. साऊदीने त्याला १०५ धावांवर तंबूत धाडले. श्रेयसने १३ चौकार आणि २ षटकार ठोकले. श्रेयसनंतर अश्विनने लंचपर्यंत किल्ला लढवला. अश्विनने ५ चौकारांसह ३८ धावा केल्या. पटेलने इशांत शर्माला पायचीत पकडत भारताचा डाव संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून साऊदीने ६९ धावांत ५, जेमीसनने ३ तर पटेलने २ बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – अजिंक्य रहाणे (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि उमेश यादव.

न्यूझीलंड – टॉम लॅथम, विल यंग, ​​केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर) , रचिन रवींद्र, टिम साऊदी, एजाज पटेल, काइल जेमीसन, विल सोमरविले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs new zealand test series first test at kanpur day three adn