Shubman Gill 1000 Runs As Captain: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने वेस्टइंडिजविरुद्ध खेळताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. गिल पहिल्या दिवशी नाबाद परतला होता. दुसऱ्या दिवसातील पहिल्याच सत्रात त्याने आपलं अर्धशतक आणि दुसऱ्या सत्रात फलंदाजी करताना आपलं शतक पूर्ण केलं. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने मोठ्या विक्रमात रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे.

रोहित सध्या कसोटी संघाचं नेतृत्व करत आहे. येत्या काही दिवसात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर गिल भारतीय वनडे संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याआधीच गिलने कर्णधार म्हणून १००० धावांचा पल्ला गाठला आहे. भारतीय संघासाठी कर्णधार म्हणून सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम हा माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि विराट कोहली यांच्या नावावर आहे. दोघांनी १५-१५ डावात हा पराक्रम आपल्या नावावर केला होता.

शुबमन गिलने हा पराक्रम १७ व्या डावात करून दाखवला आहे. या विक्रमात त्याने २ दिग्गज कर्णधारांना मागे टाकलं आहे. रोहित शर्माने २० व्या डावात आणि सौरव गांगुली यांनी २२ व्या डावात कर्णधार म्हणून १००० धावा पूर्ण केल्या होत्या. आता गिल हा कर्णधार म्हणून सर्वात जलद १००० धावा करणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.

भारतीय संघासाठी कर्णधार म्हणून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीच्या नावे १२८८३ धावा करण्याची नोंद आहे. तर एमएस धोनी दुसऱ्या स्थानी आहे. धोनीने कर्णधार म्हणून ११२०७ धावा केल्या होत्या. तिसऱ्या स्थानी असलेल्या मोहम्मद अजहरुद्दीन यांनी ८०९५ धावा केल्या होत्या. तर सौरव गांगुली यांच्या नावे कर्णधार म्हणून ७६४३ धावा करण्याची नोंद आहे. तर रोहित शर्माच्या नावे ५६६५ धावा करण्याची नोंद आहे. सचिन तेंडुलकरच्या नावे कर्णधार म्हणून ४५०८ धावा करण्याची नोंद आहे.