चौथ्या कसोटीत भारताचा एक डाव आणि ३६ धावांनी विजय; मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी
वानखेडे स्टेडियमवर सकाळी ठीक १० वाजून ०२ मिनिटांनी रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावापुढे पूर्णविराम दिला आणि क्षणार्धात मैदानावर, स्टेडियममध्ये याचप्रमाणे देशभरात विजयोत्सव सुरू झाला. इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी भारताने एक डाव आणि ३६ धावांनी जिंकली आणि मालिकासुद्धा ३-० अशी आरामात खिशात घातली. त्यानंतर संघनायक विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानावर विजयी फेरी मारत भारतीय संघाने क्रिकेटरसिकांना अभिवादन केले. या कसोटीवर आणि मालिकेवर कोहलीच्या सातत्यपूर्ण फलंदाजीची तसेच उमद्या नेतृत्वाची छाप असल्यामुळे या ऐतिहासिक क्षणांना ‘विराटोत्सव’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वानखेडेचा कलंक पुसला गेला!
वानखेडे स्टेडियमवर भारतासाठी इंग्लिशचा पेपर नेहमीच कठीण जात होता. २००६ आणि २०१३ मध्ये झालेले दोन्ही कसोटी सामने इंग्लंडने जिंकले होते. या मैदानावर भारताने १९९३ मध्ये शेवटचे इंग्लंडला हरवले होते. त्यानंतर तब्बल २३ वर्षांनी वानखेडेवरील हा कलंक पुसला गेला. इंग्लंडविरुद्धच्या मागील तिन्ही कसोटी मालिका भारताने मानहानीकारक पद्धतीने गमावल्या होत्या. ती अपयशाची मालिकासुद्धा या विराट अभियानात आता खंडित झाली. भारतीय संघाच्या अश्वमेधाने आता सलग १७ सामने अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय सलग पाचवी कसोटी मालिका भारताने जिंकण्याचे कर्तृत्व दाखवले आहे.
इंग्लंडसारख्या कसलेल्या संघाविरुद्ध भारताने मालिका जिंकली आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील हे सर्वात आकर्षक यश आहे, असे कोहलीने नमूद केले. तळाच्या फलंदाजांना साथीला घेत २३५ धावांची संस्मरणीय खेळी साकारणाऱ्या कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
वानखेडेच्याच चाहत्यांशी काही वर्षांपूर्वी कोहलीने पंगा घेतला होता. मात्र आता त्या वादाला तिलांजली देत कोहलीचे ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले आहे. ‘‘कठीण परिस्थितीत क्रिकेटरसिकच त्यातून बाहेर पडण्याची ऊर्जा देतात. चाहत्यांचे प्रेम हे भारावून टाकते. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे,’’ असे कोहलीने सामन्यानंतर सांगितले.
अश्विनची किमया
पाचव्या दिवशी सकाळी इंग्लंडला पराभव टाळण्यासाठी ४९ धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे चार फलंदाज बाकी होते. त्यांची प्रमुख मदार होती ती जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलर यांच्यावर. मात्र रविचंद्रन अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. भारताने फक्त ४८ चेंडूंत इंग्लंडचा दुसरा डाव सोमवारी अध्र्या तासात संपवला. अश्विनने दुसऱ्या डावात ५५ धावांत ६ बळी घेतले, तर सामन्यात १६७ धावांत १२ बळी घेण्याची किमया साधली. अश्विनने सातव्यांदा कसोटी सामन्यात एकंदर दहा बळी घेतले.
अश्विनच्या गोलंदाजीचे कौतुक करताना प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाले, ‘‘या संपूर्ण मालिकेत अश्विन अप्रतिम गोलंदाजी करीत आहे. आपल्या कामगिरीविषयी तो आनंदी किंवा समाधानी नसणे, हा त्याचा गुण मला अतिशय आवडतो.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘जयंत यादव आणि कोहली यांच्यातील द्विशतकी भागीदारीसुद्धा महत्त्वाची ठरली. कोणत्याही संघाशी आता तुलना करायची आवश्यकता नाही. हा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेला संघ आहे.’’
