INDIA won Women’s World Cup 2025 against South Africa: भारताच्या महिला क्रिकेट संघानं नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर इतिहास घडवला. दोन वेळा अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर तिसऱ्यांदा टीम इंडियानं विश्वविजेतेपदावर झोकात नाव कोरलं. भारताच्या या विजयात संघातल्या प्रत्येक खेळाडूसह संपूर्ण सपोर्ट स्टाफनंदेखील सर्वस्व झोकून काम केलं. सेमीफायनल आणि फायनलमध्येदेखील अमनजोत कौरनं आपल्या खेळाद्वारे टीम इंडियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. तिनं तीन प्रयत्नांत टिपलेला वोलफार्टचा झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. मात्र, विश्वचषक स्पर्धेदरम्यान अमनजोत कौरच्या आजीला हृदयविकाराचा झटका आला होता अशी माहिती आता समोर आली आहे.

अमनजोत कौरसाठी वडिलांनी लपवलं आजीचं आजारपण

टीम इंडियासोबत अमनजोत कौर तिच्या विश्वचषक विजयाच्या स्वप्नासाठी सर्वस्व पणाला लावत असताना गेल्या महिन्यात तिच्या आजी भगवंती सिंग यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्या रुग्णालयातच दाखल आहेत. पण अमनजोत कौरचे वडील भूपिदर सिंग यांनी याबाबत अमनजोत कौरला काहीही सांगितलं नाही. वर्ल्डकप स्पर्धेवरून तिचं लक्ष विचलिक होऊ नये, तिनं पूर्ण लक्ष केंद्रीत करून आपल्या ध्येयाचा पाठलाग करावा या हेतूने भूपिंदर सिंग यांनी अमनजोतला याबाबत काहीही सांगितलं नाही!

“अमनजोत जेव्हापासून मोहालीतल्या आमच्या घराजवळच्या पार्कमध्ये इतर मुला-मुलींसोबत क्रिकेट खेळायला जात होती, तेव्हापासून माझी आई भगवंती तिच्यासाठी प्रचंड मोठा आधार ठरली आहे. मी जेव्हा माझ्या कारपेंटरीच्या कामासाठी जायचो, तेव्हा आई अमनजोतवर लक्ष ठेवायची. गेल्या महिन्यात आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पण आम्ही ही गोष्ट अमनजोतला सांगितली नाही. गेल्या काही दिवसांपासून तर आम्ही सातत्याने आईच्या देखभालीसाठी रुग्णालयातच आहोत. आता अमनजोतनं भारतीय संघासाठी जिंकलेला विश्वचषक या अत्यंत तणावाच्या काळात आमच्यासाठी औषधासारखा ठरला आहे”, अशी भावनिक प्रतिक्रिया भूपिंदर सिंग यांनी दिली.

अमनजोत कौरची अष्टपैलू खेळी!

रविवारी रात्री झालेल्या रंगतदार सामन्यात भारतानं ठेवलेल्या २९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या २४६ धावांत गारद झाला. कर्णधार लॉरा वोल्फार्टनं केलेल्या १०१ धावा वगळता आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार लॉरा वॉल्फार्ट शतक झाल्यानंतर डोकेदुखी ठरू शकेल असं वाटत असतानाच दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर अमनजोत कौरनं तिचा अप्रतिम झेल टिपला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या ९ षटकांमध्ये ५१ धावांची दमदार सलामी दिल्यानंतर भारतीय संघाच्या चिंता वाढू लागल्या होत्या. तेव्हा अमनजोत कौरनंच केलेल्या अप्रतिम थ्रोवर धोकादायक वाटू लागलेली तन्झिम ब्रिट्स धावचीत झाली. याशिवाय मधल्या षटकांमध्ये द. आफ्रिकेच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने चकवण्याचं कामही अमनजोत कौरनं केलं.

याआधी सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला भारतानं पराभवाची धूळ चारली. तेव्हाही शतक झळकावून आक्रमक झालेल्या लिचफिल्डला अमनजोत कौरनं माघारी धाडलं. याशिवाय शेवटच्या षटकांमध्ये जेमिमा रॉड्रिग्जला मोलाची साथ देत भारताच्या अंतिम सामन्यातील प्रवेशावर अमनजोत कौरनं शिक्कामोर्तबदेखील केलं.