India Won the Women’s World Cup 2025: भारतीय महिला संघ वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने महिला विश्वचषक २०२५ चं जेतेपद पटकावलं. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५५ धावांनी पराभव करत जेतेपद आपल्या नावे केलं. हरमनप्रीत कौरने दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट झेल टिपला.

भारताच्या विजयाच्या शिलेदार शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा ठरल्या. अंतिम सामन्यात शफालीने ८७ धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या, तर दीप्तीने ५८ धावा केल्या, पाच विकेट्स घेतल्या आणि एका खेळाडूला रनआउटही केलं.

दीप्ती शर्माच्या ४६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नादिन दे क्लार्क मोठा फटका खेळायला गेली आणि हरमनप्रीत कौरने मागे धावत जात व उडी मारत उत्कृष्ट झेल टिपला. यासह दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २४६ धावांवर सर्वबाद झाला. तर दीप्ती शर्माने अंतिम सामन्यात पाच विकेट्स घेत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. हरमनने कमालीचा झेल टिपत मैदानावर हात पसरून धावत जात विजयाचा आनंद साजरा केला. यानंतर संपूर्ण संघाने एकत्र येत आभाळाकडे फटाके वाजताना बोट दाखवत विजयाचा आनंद साजरा केला.

भारतीय संघ जिंकताच सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना यांनी एकमेकांना मिठी मारत प्रचंड भावुक झाल्या तर कोच अमोल मुझुमदारही रडताना दिसले. क्रिकेटच्या मैदानावर फार कमी वेळेस भावुक होणारी स्मृती मानधना विश्वचषक जेतेपदावर भावुक झालेली दिसली आणि हरमनला मिठी मारून रडताना दिसली. भारताच्या विश्वचषक जेतेपद नावे केल्यानंतर जल्लोष करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.