लगान चित्रपट जवळपास साऱ्यांनीच पाहिला असेल. त्यामधील क्रिकेटचा सामना चांगलाच रंगला होता. भारतामध्ये साधारणत: अशीच क्रिकेटची सुरुवात झाली असावी. इंग्रजांचे क्रिकेट पाहून आपण शिकत गेलो. क्रिकेट म्हणजे इंग्रजांनी भारतीयांना दिलेली चिरंतर देणगी. हाच खेळ आपलासा करत भारतीयांनी त्याला डोक्यावर घेतले. २२ सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या दौऱ्यातील पहिला सामना म्हणजेच भारताची पाचशेवी कसोटी ठरणार आहे. त्या निमित्ताने आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांच्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकण्याचा हा एक प्रयत्न.

भारतीय कधीपासून नेमके क्रिकेट खेळायला लागले, हे सांगता येणे कठीण. पण इंग्रजांच्या राजवटीमध्ये काही राजे-महाराजे क्रिकेट खेळायचे. त्यावेळी हा खेळ म्हणजे एक प्रतिष्ठेचे प्रतीक वाटायचे. तिथून हा खेळ खालच्या स्तरापर्यंत झिरपत गेला आणि आता भारताच्या प्रत्येक खेडय़ापर्यंत पोहोचला. सी. के. नायडू यांच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ १९३२ साली पहिल्यांदा इंग्लंडला गेला. हे काय मोठे क्रिकेट खेळणार असे त्यांना हिणवले गेले होते. पण या सामन्याच्या पहिल्या अध्र्या तासामध्ये भारताने तीन बळी मिळवत टीकाकारांची तोंडे बंद केली होती. अनुभव आणि सातत्य नसल्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला. त्यानंतर मुंबईमध्ये इंग्लंडचा संघ १९३३ साली खेळायला आला तेव्हा लाला अमरनाथ यांनी शतक झळकावत इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला होता. १९३२ पासून जवळपास १५ वर्षे आपण इंग्लंडबरोबरच खेळत होतो. त्यानंतर १९४७ साली ऑस्ट्रेलियाबरोबर भारताचा पहिला कसोटी सामना रंगला. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळताना तब्बल २० वर्षे भारताला एकही विजय मिळवता आला नव्हता. भारताच्या संघात गुणवत्ता असली तरी कामगिरीत सातत्य दिसत नव्हते. पण १९५२ साली विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला विजय नोंदवला. चेन्नईतला हा सामना. मालिकेत इंग्लंडचा संघ १-० अशा आघाडीवर होता. पाचव्या सामन्यात त्यांनी ५ बाद २४४ अशी चांगली सुरुवातही केली होती. पण दुसऱ्या दिवशी भारताने तिखट मारा करत २६६ धावांवर इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. त्यानंतर पॉली उम्रीगर आणि पंकज रॉय यांनी शतके झळकावल्यामुळे भारताला ४५७ धावा करता आल्या आणि भारताच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर मालिका विजयासाठी अजून १९ वर्षे भारताला वाट पाहावी लागली.

अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली १९७१ साली भारताने वेस्ट इंडिजमध्ये पहिला मालिका विजय नोंदवला. सुनील गावस्कर यांचा हा पहिलाच दौरा होता. या मालिकेत सातशेपेक्षा जास्त धावा करत त्यांनी या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर इंग्लंडमध्येही मालिका जिंकत पहिला विजय ‘फ्लूक’ नसल्याचे दाखवून दिले. यानंतर भारतीय संघ खऱ्या अर्थाने विजयाचा विचार करायला लागला. कारण त्यावेळी सामना अनिर्णित राखणे हेच विजयासमान वाटत होते. वाडेकर यांच्या संघाने भारताला खऱ्या अर्थाने विजयाची सवय लावली. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाच्या कार्यकाळात एक वेगळी ओळख भारतीय संघाला मिळाली. गांगुली आक्रमक असला तरी त्याने उत्तमपणे संघबांधणी केली होती. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने कल्पकतेच्या जोरावर भारताला कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानही मिळवून दिले. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नवे विक्रम रचताना दिसत आहे.

भारतीय संघात पहिल्यापासूनच दर्जेदार फलंदाज होते. नावे घ्यावी तेवढी कमीच. भारताला फलंदाजांची परंपरा असली तरी गोलंदाजी ही नेहमीच फिरकीवर पोसली गेली. चंद्रशेखर, बेदी, प्रसन्ना या त्रिकुटाने तर प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर यथेच्छ नाचवले. भारताची सुरुवातच फिरकीने व्हायची. त्यामुळे चेंडू जमिनीवर टाकून जुना करण्याची शक्कल लढवली जायची. त्यानंतर वेंकटराघवन यांनीही काही काळ फिरकीचे सारथ्य केले. त्यानंतर काही फिरकीपटू आलेही, पण त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य नव्हते. त्यानंतर फिरकीपटू अनिल कुंबळेवर थेट आपली गाडी येऊन थांबली. कुंबळेला चेंडू फिरवताच येत नाही, अशी त्याच्यावर टीका झाली असली तरी त्याच्या नावावरच सर्वाधिक कसोटी बळी आहेत, तर सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. भारताला सर्वाधिक विजय मिळवून देणारा कर्णधार म्हणून धोनीचे नाव घ्यावे लागेल.

.. गमते उदास!

सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटची अवस्था चांगली नाही. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे कसोटीकडे मोठय़ा प्रमाणात दुलक्र्ष केले जात आहे. कसोटी क्रिकेटची परंपरा जपून राहावी, यासाठी काही प्रयोग केले जात आहेत. पण काळाच्या ओघात कसोटी क्रिकेट किती तग धरून राहील, हे पाहावे लागेल.  भारतामध्ये आयपीएल एवढी गर्दी कसोटी क्रिकेटला जमत नाही, हे दुर्दैवच.

नजाकत व दर्दी प्रेक्षकांची वानवा

ट्वेन्टी-२० च्या मुशीत पोसल्या गेलेल्या या पिढीतील खेळाडू कागदावर चांगली कामगिरी करत असले तरी त्यांच्या खेळातली नजाकत हरवलेली दिसते. आताच्या घडीला फार कमी खेळाडूंचा खेळ आवर्जून पाहण्यासारखा आहे. धावा कुटण्यासाठी क्रिकेटच्या तंत्राचा बळी दिला जाण्याचे प्रकार सर्रास घडतात. दुसरीकडे दर्दी प्रेक्षकांचीही संख्या कमी झाल्याचे जाणवते.

परदेशात अजूनही पराभूतच..

परदेशात अजूनही भारताला चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये भारतीय संघाला जवळपास प्रत्येक दौऱ्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताचे कर्णधार बदलले, पण ही पराभवाची मालिका खंडित होताना दिसत नाही.

आतापर्यंतचे कर्णधार

  • १. सी. के. नायडू १९३२-३४
  • २.विजयानगरचे महाराज १९३६-३६
  • ३.इफ्तिकार अली खान पतौडी १९४६-४६
  • ४. लाला अमरनाथ १९४७-५२
  • ५. विजय हजारे १९५१-५३
  • ६. विनू मंकड १९५५-५९
  • ७. गुलाम अली १९५५-५९
  • ८. पॉली उम्रीगर १९५५-५८
  • ९. हेमू अधिकारी १९५९-५९
  • १०. दत्ता गायकवाड १९५९-५९
  • ११. पंकज रॉय १९५९-५९
  • १२. गुलाबराय रामचंद १९५९-६०
  • १३. नरी कॉन्ट्रॅक्टर १९६०-६२
  • १४. मन्सूर अली खान पतौडी १९६२-७५
  • १५. चंदू बोर्डे १९६७-६७
  • १६. अजित वाडेकर १९७१-७४
  • १७. वेंकटराघवन १९७४-७९
  • १८. सुनील गावस्कर १९७६-८५
  • १९. बिशन सिंग बेदी १९७६-७८
  • २०. गुंडप्पा विश्वनाथ १९८०-८०
  • २१. कपिल देव १९८३-८७
  • २२. दिलीप वेंगसरकर
  • १९८७-८९
  • २३. रवी शास्त्री १९८८-८८
  • २४. के. श्रीकांत १९८९-८९
  • २५. मोह. अझरुद्दीन १९९०-९९
  • २६. सचिन तेंडुलकर
  • १९९६-२०००
  • २७. सौरव गांगुली २०००-०५
  • २८. राहुल द्रविड २००३-०७
  • २९. वीरेंद्र सेहवाग२००५-१२
  • ३०. अनिल कुंबळे २००७-०८
  • ३१. महेंद्रसिंग धोनी २००८-१४
  • ३२. विराट कोहली २०१४- आत्तापर्यंत

 

– प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com