भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापत झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) एक निवेदन जारी करत दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी ओरेगॉन येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्य पदक जिंकलं होतं. या स्पर्धेतील कामगिरीदरम्यान त्याला दुखापत झाल्याने तो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही.

याबाबत अधिक माहिती देताना आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितलं की, “भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं आज सकाळी मला अमेरिकेतून फोन केला होता. दुखापत झाल्याने आपण बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी माहिती त्यानं दिली. रविवारी पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर नीरज चोप्रा याचं सोमवारी एमआरआय स्कॅन करण्यात आलं. त्या आधारावर डॉक्टरांनी त्याला एक महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.”

हेही वाचा- World Athletics Championship: ‘रुपेरी’ कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं दिली प्रतिक्रिया, म्हणाला “हवामान अनुकूल नसूनही…”

गेल्यावर्षी टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरजने ‘सुवर्ण’ कामगिरी केली होती. त्यानंतर रविवारी ओरेगॉन येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने रौप्यपदक (सिल्वर मेडल) जिंकलं होतं. अंतिम फेरीत भालाफेक करताना चौथ्या प्रयत्नानंतर नीरजने मांडीत दुखापत जाणवत असल्याची तक्रार केली होती. सोमवारी एमआरआय केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धा दोन दिवसांवर आली असताना नीरजला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian javelin thrower neeraj chopra drops out commonwealth games due to injury rmm