ICC Women’ ODI World Cup 2025 Points Table Update: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाची दणक्यात सुरूवात झाली आहे. भारताने सुरूवातीचे दोन्ही सामने सांघिक कामगिरीच्या बळावर जिंकले आहेत. भारतीय संघाचा दुसरा सामना कोलंबोमध्ये पाकिस्तानविरूद्ध खेळवला गेला, या सामन्यात टीम इंडियाने ८८ धावांनी पाक संघावर दणदणीत विजय मिळवला. यासह टीम इंडियाने पाकिस्तानविरूद्ध वनडेमधील आपला अजेय रेकॉर्ड कायम ठेवला आहे.
पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केलं. पहिल्या सामन्यात, भारतीय महिला संघाने डकवर्थ-लुईस पद्धतीने श्रीलंकेच्या संघाचा ५९ धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाच्या विजयामुळे महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या गुणतालिकेत खळबळ उडाली आहे आणि भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे.
पाकिस्तानविरूद्ध विजयानंतर टीम इंडिया वर्ल्डकपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी
पाकिस्तानविरूद्ध सामन्यात विजयानंतर भारतीय संघ वनडे विश्वचषकाच्या गुणतालिकेत थेट पहिल्या स्थानी पोहोचला आहे. हरमनप्रीक कौरच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने २ सामन्यांमध्ये सलग दोन सामने जिंकत गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयापूर्वी, भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता आणि विजयानंतर थेट पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
भारताचे दोन सामन्यांतून चार गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट १.५१५ आहे. तर गतविजेता ऑस्ट्रेलिया आता दोन सामन्यांतून तीन गुणांसह आणि १.७८० च्या नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर, इंग्लंड आणि बांगलादेश महिला संघ २-२ गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
भारताविरुद्धच्या पराभवामुळे, महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या गुणतालिकेत पाकिस्तानी महिला संघाला मोठा धक्का बसला आहे, ज्यामध्ये त्यांना स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानी महिला संघ सध्या -१.७७७ च्या नेट रन रेटसह सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला बांगलादेशकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता.
दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ शेवटच्या स्थानावर आहे, ज्यांना त्यांच्या पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय, न्यूझीलंड महिला संघ ७व्या स्थानावर आहे तर श्रीलंका संघ २ सामन्यांत एका गुणासह गुणतालिकेत ५ व्या स्थानावर आहे.