वृत्तसंस्था, दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील विजयामुळे भारतीय संघाने क्रिकेटच्या तीनही प्रकारांतील ‘आयसीसी’च्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. मात्र, कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान राखण्यासाठी भारताने शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे गरजेचे आहे.
भारतीय संघाने जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. या कामगिरीच्या आधारे भारताने एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. भारतीय संघ ट्वेन्टी-२० क्रमवारीतही अग्रस्थानी आहे. भारतीय संघाने गेल्या काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. परंतु जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ३-१ किंवा ३-० अशा फरकाने जिंकावी लागणार आहे.
अश्विन, जडेजाला बढती
भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता. भारताच्या विजयात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यामुळे या तिघांनाही कसोटी क्रमवारीत बढती मिळाली आहे. पहिल्या कसोटीत आठ बळी मिळवणाऱ्या अश्विनने गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच जडेजाने अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान राखले असून गोलंदाजीत त्याला १६व्या स्थानी बढती मिळाली आहे. जडेजाने पहिल्या कसोटीत सात बळी आणि ७० धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. या सामन्यात १२० धावांची निर्णायक खेळी करणाऱ्या रोहितला दोन स्थानांची बढती मिळाली असून तो आठव्या स्थानी पोहोचला आहे.