IPL 2019 : संजू सॅमसनने ठोकलेले पहिलेवहिले शतक (१०२) आणि कर्णधार अजिंक्य रहाणेची अर्धशतकी खेळी (७०) यांच्या जोरावर पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने १९८ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

राजस्थानच्या संघाकडून सलामीला आलेला जोस बटलर ५ धावांवर माघारी परतला. त्याने केवळ १ चौकार लगावला. पण अजिंक्य रहाणेने संजू सॅमसनच्या साथीनं अप्रतिम फलंदाजी केली. दोघांनी आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर फटकेबाजीला सुरुवात केली. या दरम्यान रहाणे ७० धावांवर माघारी परतला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार खेचले. संजू सॅमसनने मात्र आपली फटकेबाजी सुरूच ठेवली आणि आपले ipl मधील पाहिले शतक ठोकले. त्याने ५५ चेंडूत १०२ धावा केल्या. त्याच्या या नाबाद खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकार ठोकले. बेन स्टोक्सनेही १६ धावांची नाबाद खेळी केली. हैदराबादकडून रशीद खान आणि नदीम यांनी १-१ बळी टिपला.