गेल्या काही दिवसापासून टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांची जोरदार चर्चा सुरु आहे. २०१९ ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ही अवघ्या दोन महिन्यांवर आहे. या आधी भारतात IPL स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे IPL २०१९ मधील खेळ आणि कामगिरी याच्या जोरावरच भारताच्या फलंदाजीतील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरेल, असा विश्वास माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केला आहे. याबरोबरच या क्रमांकावर खेळण्यासाठी नवोदित खेळाडू ऋषभ पंत हा एक उत्तम पर्याय असू शकतो असेही मत त्याने व्यक्त केले.
टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर कोणी फलंदाजी करावी, यासाठी सध्या निवडकर्त्यांकडे बरेच पर्याय आहेत. पण मला असे वाटते की याबाबतचा अंतिम निर्णय IPL च्या कामगिरीनंतरच होईल. मी काही दिवसांपूर्वी चेतेश्वर पुजाराचे नाव घेतले होते. कारण तो सध्या चांगल्या लयीत आहे. अशाच प्रकारची जबाबदारी राहुल द्रविडने पार पाडली आहे. मी त्यावेळी स्वतः संघाचा कर्णधार होतो. त्यामुळे कोणाचाही पर्याय मिळाला नाही, तर पुजारा हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय अंबाती रायडू किंवा ऋषभ पंत यापैकी एक खेळाडूदेखील ही भूमिका पार पाडू शकतो. प्रत्येक जण आपले मत व्यक्त करत आहे. मीदेखील माझे मत सांगितले. पण विराटला या क्रमांकावर कोण खेळेल? हे नीट माहिती आहे, असे गांगुली म्हणाला.
IPL च्या गेल्या हंगामात ऋषभ पंत हा एक उत्तम खेळाडू म्हणून उदयास आला. पण एकदिवसीय क्रिकेट संघात त्याला कधी संघात स्थान मिळाले तर काही वेळा त्याला महेंद्रसिंग धोनीच्या संघातील समावेशामुळे बाहेर बसावे लागले. पण पुढच्या १० वर्षात तो एक उत्तम आणि प्रतिभावान खेळाडू म्हणून उदयास येईल आणि टीम इंडियाला देखील त्याचा अभिमान वाटावा अशी कामगिरी तो करेल, असे गांगुली म्हणाला.
गांगुलीच्या मताला दुजोरा देत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग म्हणाला की टीम इंडियातील खेळाडूंची निवड मला करायला सांगितली तर मी नक्कीच चौथ्या क्रमांकसाठी ऋषभ पंतची निवड करेन. ऋषभ त्याच्या प्रतिभेच्या जोरावर संघाला सामने जिंकवून देऊ शकतो. IPL मध्ये आम्हाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसे झाले तरच खेळाडूंना विश्वचषक संघात स्थान मिळेल.