IPL 2021: मैदानामध्येच प्रँकच्या गुगलीने पंतने पंचांनाच केलं क्लिन बोल्ड; पाहा मजेदार व्हिडीओ

पंच आणि खेळाडूंमध्ये होणारे वाद आता आयपीएलसाठी काही नवीन गोष्ट नाही, मात्र बुधवारच्या सामन्यात काहीतरी हटके घडलं मैदानात

Rishabh Pant Anil Chaudhary
हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.

आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये अटीतटीच्या सामन्यात अनेकदा पंच आणि खेळाडूंमध्ये वाद होताना दिसतात. मागच्याच सामन्यामध्ये बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीने पंचांना खडेबोल सुनावल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. मात्र काल झालेल्या दिल्ली विरुद्ध कोलकात्या सामन्यामध्ये याच्या अगदी उलट चित्र पहायला मिळालं. गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यानंतर वेंकटेश अय्यर (५५) आणि शुभमन गिल (४६) यांच्या दमदार सलामीमुळे कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर तीन गडी आणि एक चेंडू राखून विजय मिळवला. त्यामुळे दिल्लीचे पहिल्यांदा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. या सामन्यामधील शेवटच्या चार षटकांमध्ये दिल्लीने पूर्ण प्रयत्न करत सामना अतिशय रंजक स्थितीमध्ये आणला. कर्णधार ऋषभ पंतने योग्यवेळी गोलंदाजांमध्ये बदल करत सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल याची काळजी घेतली. मात्र सामन्यातील शेवटून दुसऱ्या चेंडूवर कोलकात्याने अंतिम सामन्याचं तिकीट कन्फॉर्म केलं. मात्र यापूर्वीच सामन्यात पंतने केलेली एक गोष्ट सध्या चर्चेत आहे. त्याने केलेल्या कृतीचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पंत हा सामन्यामधील पंच अनिल चौधरी यांना ट्रोल करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पंत जेव्हा नाणेफेक होण्याआधी मैदानावर आला तेव्हा त्याने पंचांची खोड काढली. पंतने मागून येत पंच अनिल चौधीर यांना उजव्या बाजूने पाठीला हात लावला आणि तो डावीकडे जाऊन उभा राहिला. मात्र आपल्याला कोण बोलवत आहे हे पाहण्यासाठी अनिल चौधरी मागे वळले तर मागे कोणीच नव्हतं. चौधरी एकदम गोंधळलेल्या हावभावासहीत कोणी हात लावला हे शोधत होते. त्यानंतर त्यांनी डावीकडे पाहिले असता त्यांच्या बाजूला पंत हसत उभा होता. तेव्हाच चौधरी यांना पंतनेच आपली खोड काढल्याचं लक्षात आलं. पंतकडे पाहताच चौधरीही हसू लागले. हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून अनेकांना पंतचा हा लहानमुलाप्रमाणे केलेला खोडकरपणा फारच आवडल्याचं दिसत आहे.

यापूर्वीही पंतने अशाप्रकारे प्रशिक्षण रिकी पॉण्टींगच्या मागे उभं राहून वाकुल्या दाखवल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दरम्यान, सामन्यासंदर्भात बोलायचं झाल्यास, दिल्लीने दिलेले १३६ धावांचे लक्ष्य कोलकाताने १९.५ षटकांत गाठत तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. डावखुऱ्या अय्यरने (५५) सुरुवातीपासून दिल्लीच्या गोलंदाजांवर दडपण टाकले, तर गिलने (४६) त्याला उत्तम साथ दिली.  तसेच नितीश राणा (१३) झटपट बाद झाला. यानंतर चार षटकांत १३ धावांची आवश्यकता असताना कोलकाताने सात धावांत सहा बळी गमावले. मात्र, अखेरच्या षटकात दोन चेंडूंत सहा धावांची गरज असताना राहुल त्रिपाठीने (नाबाद १२) षटकार मारत कोलकाताला विजय मिळवून दिला. आता शुक्रवारी जेतेपदासाठी कोलकातापुढे चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2021 rishabh pant pulls a hilarious prank on umpire anil chaudhary scsg

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी