इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) स्थान मिळावे म्हणून ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू विराट कोहलीसह भारताच्या क्रिकेटपटूंना चिथावत नाहीत तर ते त्यांना खूश ठेवतात, असा गौप्यस्फोट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने गेल्या आठवडय़ात केला होता. मात्र भारताचा माजी कसोटी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘एखाद्याशी चांगले संबंध असण्याचा आणि आयपीएलमधील स्थानाचा समावेश नाही. आयपीएलमधील कोणताही संघमालक हा त्या खेळाडूची गुणवत्ता पाहून निवड करतो. संघाला जिंकून देणारा खेळाडू नेहमी हवा असतो. गुणवान खेळाडूंनाच आयपीएलमध्ये करारबद्ध होता येते. तेव्हा कोणत्याही खेळाडूंशी तुमचे कसे संबंध आहेत याचा आयपीएलमधील स्थानाशी संबंध नाही,’’ असे सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रशिक्षक असलेल्या लक्ष्मण याने सांगितले. ‘‘जर एखाद्या भारतीय खेळाडूशी मैत्री असेल तर त्याचा आणि आयपीएलमधील समावेशाचा कोणताही संबंध नाही. मी एक प्रशिक्षक या नात्याने नेहमी आयपीएल लिलावासाठी उपस्थित असतो. जे आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांच्या देशासाठी सर्वोत्तम कामगिरी बजावतात त्यांची आम्ही निवड करतो,’’ असे लक्ष्मण याने क्लार्कच्या आरोपांचे खंडन करताना स्पष्ट केले.

भारताचे माजी सलामीवीर कृष्णाम्माचारी श्रीकांत यांनीही क्लार्कवर टीका केली आहे. ‘‘शेरेबाजी करुन फक्त सामने जिंकता येत नाहीत. क्लार्क याने आयपीएलसंबंधी केलेले विधान मूर्खपणाचे आहे,’’ असे श्रीकांत यांनी म्हटले.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यानेही क्लार्कच्या आरोपांचे खंडन केले आहे. ‘‘कोहलीसारख्या खेळाडूला मैदानात उचकावणे हे नेहमीच धोकादायक असते. यास्थितीत त्याच्याविरुद्ध आम्ही मैदानावर आक्रमक धोरण स्वीकारत नाही. मात्र हे आयपीएलचा करार मिळवण्यासाठी नाही तर कोहलीची बॅट शांत ठेवण्यासाठी असते,’’ असे पेनने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl selection in from quality abn