शनिवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जवर सात गडी राखून विजय नोंदविला. कर्णधार म्हणून ऋषभ पंतचा हा पहिला सामना होता. त्याने केलेल्या नेतृत्वाविषयी सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शॉ म्हणाला, की त्याच्या संघात नियमित कर्णधार श्रेयस अय्यरची कमतरता भासत आहे. पण पंत एक उत्कृष्ट कर्णधार आहे. सीएसके विरुद्धच्या सामन्यात कर्णधार पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 188 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात शिखर धवन (85 धावा) आणि शॉ (72 धावा) यांच्या दमदार सलामी भागीदारीमुळे दिल्लीने हे आव्हान 7 गडी राखून गाठले.

सामन्यानंतर शॉ म्हणाला, “आम्हाला खरोखरच श्रेयस अय्यरची कमतरता भासत आहे. त्याने संघाचे चांगले नेतृत्व केले. असे असले, तरी ऋषभ पंतही खूप हुशार आणि निर्भीड कर्णधार आहे आणि तो खेळाचा आनंद घेतो. मैदानावर तो खूप करमणूक करतो. तो कर्णधार म्हणून खूप शांत आहे. संघासाठी ऋषभ चांगले काम करत आहे.”

ऑस्ट्रेलियामधील खराब कामगिरीनंतर भारतीय संघातून बाहेर बसवण्यात आलेल्या शॉने सांगितले, की तो अद्याप भारतीय संघात परतण्याचा विचार करत नाही. शॉने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चार शतके ठोकली होती. आता शॉने आयपीएलच्या या हंगामाच्या पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले आहे.

शॉ म्हणाला, “मी सध्या भारतीय संघाबद्दल फारसा विचार करत नाही, कारण संघातून काढून टाकणे खरोखर निराशाजनक होते. मी त्याच्या पुढे गेलो आहे. माझ्या फलंदाजीच्या तंत्रात कमतरता असल्याचे मी जाणतो आणि मला त्यात आधी सुधारणा करावी लागेल. त्यासाठी मी कोणताही सबब सांगू शकत नाही.”

यशाचे श्रेय अमरे सरांना

भारताकडून 37 एकदिवसीय आणि 11 कसोटी सामने खेळणार्‍या प्रवीण अमरे यांना पृथ्वी शॉने आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने सांगितले, की जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये त्याली संघातून काढले गेले, तेव्हा त्याने प्रवीण अमरे यांची मदत घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार काम केले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dc opener prithvi shaw praises captain rishabh pant adn