CSK vs KKR IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली असून पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि गतउपविजेता कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान खेळण्यात आला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येतआलेल्या या सामन्यात चेन्नईच्या संघाला त्यांच्या नावाला साजेशी खेळी करण्यात अपयश आलं असून चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना केवळ १३१ धावा केल्या. कोलकात्याने आरामात ही धावसंख्या गाठत यंदाच्या आयपीएलची सुरुवात विजयासह केली.
नक्की पाहा >> Viral Video: “मैदानाजवळून येताना असं वाटलं की…”; CSK बद्दल बोलताना Commentator रैना भावूक, Video ला हजारो व्ह्यूज
महेंद्रसिंग धोनीने ऐनवेळी केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नईला ही धावसंख्या गाठता आली. मात्र दुसरीकडे कोलकात्याच्या संघाने चांगली सुरुवात केल्यानंतर त्यांनी झटपट तीन विकेट्स गमावल्या. ड्वेन ब्राव्होने व्यंकटेश अय्यर आणि नितिश राणाला बाद केलं. ब्राव्होने या दोघांना बाद केल्यानंतर एका खास पद्धतीने सेलिब्रेशन केलं. मात्र या सेलिब्रेशनचा नेमका अर्थ काय आहे याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीय.
तसे वेस्ट इंडिजचे सर्वच खेळाडू मैदानावरील त्यांच्या खास सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात. कोणी सॅल्यूट करुन सेलिब्रेशन करतो तर ख्रिस गेलसारख्या खेळाडूंनाही अगदी गंगनम स्टाइलसारख्या गाण्यांवर नाचताना चाहत्यांनी पाहिलंय. याच अनोख्या सेलिब्रेशनमध्ये आज ड्वेन ब्राव्होच्या सेलिब्रेशनची भर पडली आहे.
खरं तर ड्वेन ब्राव्होने विकेट घेतल्यानंतर तो कसं सेलिब्रेशन करतो याची उत्सुकता चाहत्यांना असते. यावेळेस चाहत्यांना ड्वेन ब्राव्होचा नवा डान्स पहायला मिळाला. ब्राव्होने व्यंकटेशची विकेट घेताच चेन्नईचे चाहते ब्राव्होच्या चॅम्पियन गाण्यावर नाचताना दिसले मात्र मैदानामध्ये ब्राव्हो स्वत: काही हटके स्टेप्स करताना दिसला.
ब्राव्हो एक हात कंबरेवर ठेऊन एका हताने एक आकडा दाखवत करत असलेलं हे सेलिब्रेशन म्हणजे त्याच्या नवीन गाण्यातील स्टेप आहे. या गाण्याचं नाव नंबर वन असं आहे. ब्राव्हो हा स्वत: प्रोफेश्नल डिजे आणि गायक आहे. त्यामुळेच तो त्याच्या नवीन गाण्यांच्या स्टेप्स क्रिकेटच्या मैदानामध्येही अनेकदा सेलिब्रेशन म्हणून वापरतो. यंदा त्याने ‘नंबर वन’ची निवड केली. या अशा सेलिब्रेशनमधून तो आपल्या गाण्यांची जाहिरात करण्याबरोबरच चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा हेतू असल्याचं सांगतो. चेन्नईचा पहिल्या सामन्यात पराभव झाला असला तरी ब्राव्होच्या या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा दिसून येत आहे.
आता ब्राव्होचं हे ‘नंबर वन’ सेलिब्रेशन चेन्नईच्या चाहत्यांना वारंवार पाहण्याची इच्छा असणार तर दुसरीकडे संपूर्ण आयपीएल हंगामामध्ये कमीत कमी वेळा ब्राव्होला हे सेलिब्रेशन करता यावं असं खेळण्याकडे विरोधी संघांचा प्रयत्न असणार हे नक्की. कोलकात्याने हा सामना ९ चेंडू आणि सहा गडी राखून जिंकला.