राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी १४ वर्षांचा वाटतो का? असा प्रश्न चाहत्यांसह ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनीही उपस्थित केला. यादरम्यान त्यांनी भारतीय क्रिकेटमधील वयचोरी आणि वयचोरी केलेल्या खेळाडूंच्या नावाचा उल्लेख करत उदाहरणं दिली.

सुनंदन लेले यांनी भारतीय क्रिकेटमधील वयचोरीबाबत बोलताना ३-४ किस्से सांगत कोणत्या खेळाडूंनी वयचोरी करत क्रिकेट खेळलं आहे, याबाबत नावाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले. “मी महाराष्ट्राकडून अंडर-१९ सामने खेळायचो तेव्हाची एक गोष्ट, जेव्हा आम्ही रोहतक, चेन्नई जेव्हा झोनल सामने खेळायला जायचो. त्यावेळी आम्ही हादरायचो कारण महाराष्ट्रीयन खेळाडूंची चण त्यामानाने लहान असते आणि अंडर-१९ला आम्हाला मिसरूडही फुटलं नव्हतं, पण पंजाब, दिल्ली, उत्तरप्रदेशचे खेळाडू हिरवी दाढी झालेले असायचे. हिरवी दाढी म्हणजे खूप वेळा जेव्हा यंग जनरेशनी दाढी केल्यावर जशी दिसते, तसे ते दिसायचे नुसते आडदांड आणि आम्हाला वाटायचं हे एवढं कसं काय. मग कळलं, खासकरून उत्तर भारतात वय चोरण्याची एक नेहमीची पद्धत आहे. ही ३५-४० वर्षांपूर्वीची गोष्ट होती.”

इरफान पठाण-युवराज सिंगचा किस्सा

युवराज सिंग आणि इरफान पठाण यांच्यातील किस्सा सांगताना सुनंदन लेले म्हणाले, “इरफान पठाणने मला हा किस्सा सांगितलेला होता. इरफान जेव्हा अंडर-१९ चा खेळाडू म्हणून भारतीय संघात दाखल झाला होता, तेव्हा युवराज सिंग चांगला मुरलेला खेळाडू होता. तेव्हा युवराजने सिनियर म्हणून दादागिरी गाजवत इरफानला विचारलं, काय रे खरं वय काय तुझं? तेव्हा मिश्किल स्वभावाचा इरफानने पाजी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून चालतोय, असं इरफान म्हणताच युवराजने त्याची गचांडी पकडली आणि मग त्याच्याबरोबर हसताना दिसला, असं लेले म्हणाले.

उत्तरप्रदेशच्या संघात १४ खेळाडूंचा जन्म १ ते १० सप्टेंबरदरम्यान

उत्तरप्रदेशचा अंडर-१९चा एक संघ असा होता, ज्यामध्ये १५ पैकी १४ खेळाडूंचे जन्म हे १ ते १० सप्टेंबरमध्ये झाले होते. कटऑफ डेट जी असते ती १५ सप्टेंबर होती. वय चोरण्याची ही गोष्ट भारतीय क्रिकेटमध्ये तर अव्याहत आहे. मुख्य मुद्दा म्हणजे खेळाडू वय का चोरतात? आपल्याला हे माहितीये की, जेव्हा खेळाडू १७ वर्षांचा असतो तेव्हा त्याची ताकद वेगळी असते आणि तो १९,२०चा होतो तेव्हा त्याच्या ताकदीत खूप लक्षणीय फरक दिसायला लागतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.

वयचोरीबाबत सविस्तर सांगताना लेले म्हणाले, “खरं तर होतं काय की जो २० वर्षांचा मुलगा आहे, तो १८ वर्षाच्या मुलावरती दादागिरी करणं हे एकदम स्वाभाविक आहे. मग बॉलर असो वा बॅटर. बॉलरच्या बॉलिंगमध्ये तर बॅट्समनच्या फटक्यामध्ये ताकद असते आणि मग हे कुरघोडी करून वरचढ ठरतात. पण पुढे जो इतिहास आहे त्यावर लक्ष दिलं तर भारताकडून अंडर -१९ खेळलेले खेळाडू हे कितीही मर्दुमकी गाजवत असले तरी नंतरच्या काळात हे खेळाडू वरच्या ओपन गटात यशस्वी ठरत नाहीत. कित्येक जण जे भारताच्या अंडर-१९ संघाचे कर्णधार होते, पण नंतर मुख्य प्रवाहात ते मिसळू शकले नाहीत आणि ते बाहेर फेकले गेले.”

“भारताच्या अंडर-१९ संघातील फार कमी खेळाडू मुख्य भारतीय संघाकडून खेळले, अशी एक उदाहरणं आहेत. याचं कारण म्हणजे, याला वय चोरीची गोष्ट सुद्धा कारणीभूत ठरते. त्यामानाने वेस्ट झोन, साऊथ झोन यांच्यात वयचोरीचा प्रकार कमी आहे. पण उत्तर भारतात ही वय चोरी प्रचंड मोठ्या प्रमाणात होते”, अशी माहिती लेले यांनी दिली.

अंडर-१९ खेळताना सर्फराझचं नेमकं वय किती होतं?

ज्येष्ठ पत्रकार लेले पुढे म्हणाले, “मला हे सांगायचं नव्हतं पण सर्फराझ खान जो भारतीय संघाकडून खेळला, तो अंडर-१९ होता का? अजिबात नव्हता. कारण त्याच्या शाळेत एकत्र शिकणाऱ्या मुलाने सांगितलं की, आम्ही दोघे एका वयाचे आहोत. माझं वय २० उलटून गेलंय आणि सर्फराझ खान अजूनही अंडर-१९ खेळतोय कारण त्यावेळेला या वर्गात शिकलेल्या मुलांचं वय कमी कसं होतं का कळीचा मुद्दा आहे.”

वयचोरीला नेमकं कारणीभूत कोण? प्रशिक्षक की पालक?

“वय चोरीच्या मुद्द्यात प्रशिक्षकांचा सहभाग नसतो. यामध्ये मुलं आणि त्यांच्या पालकांचा मुख्यत्त्वे सहभाग असतो. याचं कारण शाळेत जो जन्मदाखला सादर केलाय, तो नंतरच्या काळात अॅफिडेविट करून ना ना प्रकार करून आणि आता डिजिटलाईझ गोष्टींचा आधार घेऊन जर तुम्ही ती जन्मतारीख बदलली, तर ही खरी चोरी पालकांसमवेत असते, आई बाबा कोणी असो. यामध्ये आईचं प्रमाण कमी आहे. पण बाबा आणि काका, मामा या कॅटेगरीतील लोकं ही या प्रमाणात चोरी करताना मुलांना मदत करतात. कारण मोठ्यांना प्रोसिजर माहित असते. कोणीतरी काका, मामा वकिल असतो आणि मग कुठल्यातरी कोर्टात जाऊन अॅफिडेविट करून त्याची डिजिटल प्रिटं वैगेरे घेऊन ही मुलं चोरलेलं वय दाखवतात, अशी माहिती सुनंदन लेले यांनी दिली.

पुढे म्हणाले, मला राग या गोष्टीचा येतो की जर का असोसिएशनला धादांत कळत असतील पुरावे दाखवले जात असतील की अरे या मुलाची जन्मतारीख ही होती आणि आता तो मुलगा वेगळी दाखवतोय तर केवळ याच्याकडे काना डोळा करायचा म्हणून किंवा बीसीसीआयने जे नियम घालून दिलेत, त्याच्याप्रमाणे हा खेळाडू यात बसतो.

बोन टेस्ट नेमकी काय असते?

“दुर्देव असं आहे की १७ वर्षाच्या मुलाची बोन टेस्ट जी असते, ही बोन टेस्ट म्हणजे हाडाची चाचणी ज्यामध्ये खेळाडूच्या मनगटाची चाचणी केली जाते आणि वयाचा अंदाज ठरवला जातो. बिचारी १७ वर्षाची पोर जी धडधाडक असतात डबल आयडी असतात त्यांना या टेस्टमध्ये नापास ठरवलं जातं पण वय चोरणाऱ्या मुलांना नापास ठरवलं जात नाही आणि त्यांच्यावर कोणती कारवाई केली जात नाही आणि म्हणून यामध्ये असं दिसतं की अंडर-१९ ला ही पोरं मैदानावर मर्दुमकी गाजवतात पण नंतर आयुष्यात ओपन क्रिकेटमध्ये हे खेळाडू सपशेल फेल ठरतात”, अशी माहिती लेले यांनी दिली.

लेले यांनी बीसीसीआयचा उल्लेख करत सांगितलं की, “हा एक कळीचा मुद्दा आहे. अनेक वेळा बीसीसीआयने सुद्धा कित्येकदा भाष्यदेखील केलं आहे. पण बोट ठेवून त्याच्यावर कारवाई करणं हे बीसीसीआयलाही जमलेलं नाही आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसुद्धा डोळ्याला स्पष्ट दिसत असून आता याच्यावर कारवाई करत नाहीये.”