प्रारंभीच्या टप्प्यात चांगली कामगिरी केल्यानंतर सततच्या पराभवांमुळे गुणतालिकेत तळाशी पोहोचलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी मंगळवारचा सामना म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. मंगळवारी जयपूरच्या घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणाऱ्या लढतीतून विजयी मार्गावर परतण्याचे वेध राजस्थानला लागले आहेत. लागोपाठच्या तीन पराभवांमुळे राजस्थानचा संघ अगदी तळाशी जाऊन पोहोचला आहे. इंदूर येथे दोनच दिवसांपूर्वी पंजाबकडून पराभूत झाल्यानंतर राजस्थानला पुन्हा त्यांच्याशी लढायचे आहे. तिथे राजस्थानच्या फलंदाज किंवा गोलंदाजांपैकी कुणालाही प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे बाद फेरी गाठण्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकणे राजस्थानला अत्यावश्यक बनले आहे.  जयपूरच्या घरच्या मैदानावर त्यांनी तीनपैकी दोन सामने जिंकले असल्याने निदान या मैदानावर तरी राजस्थान चांगली कामगिरी करण्याची आस लावून बसला आहे. दुसरीकडे पंजाबचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. त्यांची सलामीची जोडी कमालीची यशस्वी झाली असून लोकेश राहुल आणि ख्रिस गेलपैकी किमान एक जण तरी खेळपट्टीवर धावा करत आहेत. करुण नायर आणि मार्कस स्टोइनीस फलंदाजीत उपयुक्त योगदान देत आहेत. त्याशिवाय गोलंदाजीतही कर्णधार रवीचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली  पंजाबच्या संघाने चमक दाखवली असल्याने त्यांचे पारडे निश्चितच जड दिसते.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स