आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत शारजाच्या मैदानात फटकेबाजी केली. बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने लोकेश राहुल, गेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हे आव्हान सहज पूर्ण केलं. ४५ चेंडूत १ चौकार आणि ५ षटकार लगावत गेलने ५३ धावांची खेळी केली.

ख्रिस गेलने केलेल्या या फटकेबाजीच भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने कौतुक केलं आहे. ख्रिस गेलच्या फटक्यात इतकी ताकद आहे की त्याने मारलेला शॉट हा शारजावरुन अबु धाबीलाही जाऊ शकतो अशा आशयाचं ट्विट युवराजने केलं आहे.

पंजाबच्या संघाने आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये ख्रिस गेलला संधी दिली नाही. मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल ही जोडी चांगला खेळ करत असल्यामुळे पंजाबने त्यांच्यावर विश्वास दाखवला. काही दिवसांपूर्वी गेलची तब्येत खराब झाल्यामुळे त्याला उपचारही घ्यावे लागले. मात्र या सर्वांवर मात करत गेलने दमदार पुनरागमन करत आजही आपल्यात आधीसारखाच फॉर्म शिल्लक असल्याचं दाखवून दिलं आहे. विजयानंतर संघाचा कर्णधार लोकेश राहुलने गेलचं कौतुक केलं. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्यात बरी नव्हती, तरीही त्याच्यातली धावांची भूक कायम होती असं राहुल म्हणाला.