चेन्नईविरूद्धच्या ‘करो वा मरो’च्या सामन्यात पंजाबच्या संघाला ९ गड्यांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. आधीच स्पर्धेबाहेर गेलेल्या चेन्नईच्या संघाचा विजयामुळे शेवट गोड झाला. पण या पराभवामुळे पंजाबच्या ‘प्ले-ऑफ्स’च्या आशा माळवल्या. दीपक हुड्डाच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीमुळे पंजाबने २० षटकात १५३ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना फाफ डु प्लेसिसला अर्धशतकाने हुलकावणी दिली, पण पुणेकर ऋतुराज गायकवाडने सलग तिसरं अर्धशतक झळकावत चेन्नईला दणदणीत विजय मिळवून दिला.

ऋतुराजचं सलग तिसरं अर्धशतक…

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पंजाबच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली. पण अर्धशतकी भागीदारी करण्याआधीच मयंक २६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ लोकेश राहुलही २९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर पंजाबने ठराविक अंतराने गडी गमावले. ख्रिस गेल (१२), निकोलस पूरन (२) स्वस्तात तंबूत गेले. मनदीप सिंगही १४ धावा काढून बाद झाला. पण दीपक हुड्डाने एक बाजू लावून धरत २६ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा केल्या आणि संघाला १५३ धावांपर्यंत मजल मारून दिली. चेन्नईकडून लुंगी एन्गीडीने ३ तर शार्दुल ठाकूर, जाडेजा आणि इमरान ताहीरने १-१ बळी टिपला.

दीपक हुड्डाची धडाकेबाज खेळी…

या आव्हानाचा पाठलाग करताना फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड जोडीने चेन्नईला धडाकेबाज सलामी मिळवून दिली. या दोघांनी ८२ धावांची भागीदारी केली, पण डु प्लेसिसला अर्धशतकाने हुलकावणी दिली. तो ३४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने आपली दमदार फलंदाजी सुरूच ठेवली आणि सलग तिसरं अर्धशतक झळकावलं. रायडूच्या साथीने त्याने चेन्नईला ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. ऋतुराजने ४९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६२ धावा केल्या. रायडूनेही नाबाद ३० धावा केल्या.